पीएमपीची लांब पल्ल्याची “थेट’ सेवा बंद

दोन टप्प्यांत वाहतूक, दहा मिनिटांच्या वारंवारिता


पाबळ, तळेगावसाठी वाघोलीवरुन सुटणार बसेस

पुणे – सातत्याने जाम होणारा रस्ता, कोंडी यामुळे अनेकदा पीएमपीच्या लांब पल्ल्यांच्या मार्गावरील फेऱ्यांना उशीर होतो, तर काही वेळा नाईलाजास्तव फेऱ्या रद्द करण्याची नामुष्की ओढवते. यामुळे पीएमपीने नगर रस्त्यावरील लांब पल्ल्याची थेट वाहतूक बंद केली आहे. जादा बसेस उपलब्ध व्हाव्या आणि फेऱ्यांची संख्या वाढून प्रवाशांना सुरळीत सेवेसाठी या मार्गावर दोन टप्प्यांत वाहतूक सुरु करण्यात आली आहे.

सध्या नगर रस्त्यावरील पाबळ, शिक्रापूर आणि तळेगाव आदी भागात जाणाऱ्या प्रवाशांना महापालिका येथील पीएमपी स्थानकावरुन थेट सेवा दिली जात होती. मात्र, आता महापालिका ते वाघोलीपर्यंत सेवा दिली जाणार आहे. तर, वाघोली येथून दुसऱ्या बसने पुढील प्रवास करावा लागणार आहे. यासाठी बसेसची संख्या वाढवण्यात आली असून फेऱ्यांमध्ये वाढ होणार आहे. या मार्गावरील प्रवाशांना दर दहा मिनिटांच्या वारंवारितेने बस उपलब्ध करुन दिल्याची माहिती पीएमपी प्रशासनाने दिली.

पीएमपीतर्फे शहरासह उपनगरांतही सेवा पुरवली जाते. यानूसार नगर रस्त्यावरुन वाघोली, तळेगाव ढमढेरे, शिक्रापूर, पाबळ या लांब पल्ल्यांच्या मार्गावर सेवा दिली जाते. महापालिका ते पाबळ अंतर सुमारे 41 किलोमीटर इतके मोठे आहे. यातच नगर रस्ता सातत्याने वाहतूक कोंडीत अडकत असल्याने ये-जा करणाऱ्या पीएमपी बसेसला उशीर होत असे, तर अनेकदा तासनतास बस कोंडीत अडकून पडल्याने फेऱ्याही रद्द करण्याची नामुष्की येते. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत असे. यामुळे नगर रस्त्यावरील वाहतूक दोन टप्प्यात सुरू करण्यात आली असून मंगळवार (दि.20) पासून त्याची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे.

….थेट बससेवा बंद करण्याची कारणे
– नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे फेऱ्यांची संख्या कमी
– लांब पल्ल्यांचा मार्ग असल्याने बसेसला उशीर
– महापालिका ते वाघोली आणि वाघोली ते पाबळ, तळेगाव या दोन टप्प्यात फेऱ्या वाढण्याची शक्‍यता
– प्रवाशांना जादा बसेस उपलब्ध होऊन प्रवास सुखकर

तीन महिन्यांपूर्वी पुणे स्टेशन ते राजगुरुनगर सेवा बंद
लांब पल्ल्यांच्या सुरळीत वाहतुकीसाठी साधारण तीन महिन्यांपूर्वी पुणे स्टेशन ते राजगुरुनगर थेट सेवा बंद करण्यात आली. तेव्हापासून पुणे स्टेशनवरुन भोसरीपर्यंत सेवा पुरवली जाते. तर, भोसरीवरुन राजगुरुनगरसाठी बसेस उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत.

नगर रस्त्यावरील वाहतूकोंडी, लांब पल्ल्याच्या मार्गामुळे अनेकदा बसेसला उशीर होत असे. यामुळे दोन टप्प्यात वाहतूक सुरू करण्यात आली असून फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. नव्या वेळापत्रकानुसार दर दहा मिनिटांच्या वारंवारितने प्रवाशांना बसेस उपलब्ध होणार असल्याने गैरसोय टळणार आहे.
– दत्तात्रय माने, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)