पीएमपीचा पाय खोलात!

डीझेल दरवाढीचा दणका

– महिनाभरात तब्बल 6 रुपयांनी डीझेल महागले
– सोमवारपासून आणखी 1 रु.20 पैसे वाढीचा भार
– कठोर निर्णय घेतला जाण्याची शक्‍यता

पुणे – जुन्या बसेसची वाढती संख्या, देखभाल-दुरुस्ती खर्च वाढल्याने तोट्याच्या गर्तेत अधिकाधिक खोल जाणाऱ्या पीएमपीचा पाय गेल्या चार महिन्यांत आणखी खोलात गेला आहे. मागील चार महिन्यांत डीझेलच्या दरात सुमारे 4 रुपये 15 पैशांनी वाढ झाली आहे. तर, एकट्या सप्टेंबरमध्ये तब्बल 6 रुपये 25 पैशांनी डीझेल महागल्याने पीएमपीला मोठा फटका बसला आहे. सोमवारपासुन (दि.1) 1 रुपया 20 पैशाने डीझेलदरात वाढ झाल्याने हा तोटा भरून काढण्यासाठी काही कठोर निर्णय घेतले जाण्याची शक्‍यता आहे.

डीझेलचा वाढता आलेख
75.00 रु.
आजचा दर


68.75 रु.
महिनाभरापूर्वीचा दर

पीएमपीच्या ताफ्यात 800 पेक्षा जास्त बसेस डीझेलवर धावणाऱ्या आहेत. यासाठी पीएमपीला दररोज सुमारे 38 हजार लिटर डीझेल खरेदी करावे लागते. ऑगस्टच्या शेवटी पीएमपीला 68.75 रुपये प्रतिलिटर दराने डीझेल उपलब्ध होत होते. आता यात कमालीची वाढ झाली असून सोमवारपर्यंत पीएमपीला 75 रुपये प्रतिलिटर दराने डिझेल खरेदी करावे लागत आहे. हे डीझेल थेट कंपनीकडून सवलतीच्या दरात मिळत असले, तरी 1 मेपासून त्यातही सातत्याने वाढ झाली आहे. त्यामुळे पीएमपीचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

प्रथमच मोठा फटका
पीएमपीला होलसेल दरात बाहेरील दरांच्या तुलनेत स्वस्त डीझेल मिळते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून बाहेरील दर सातत्याने वाढत असल्याने पीएमपीसाठी लागणाऱ्या इंधन दरातही दर पंधरा दिवसांनी वाढ होत आहे. यामुळे 1 सप्टेंबर रोजी 1 रुपया 60 पैसे, 16 सप्टेंबर रोजी 3.45 पैसे आणि सोमवारी (दि.1) 1 रुपया 20 पैस अशा प्रमाणात दर वाढले आहेत. पीएमपीला प्रथम मोठा फटका बसला आहे.

डीझेल दरवाढीचा फटका मागील काही महिन्यांपासून सहन करावा लागत आहे. मात्र, सप्टेंबरमध्ये प्रथमच इंधनदरात मोठी वाढ झाली. इंधनबचतीसाठी सर्व स्तरावर प्रयत्न केले जात असून जास्तीत जास्त बसेस मार्गावर आणून उत्पन्नवाढीचे प्रयत्न केले जात आहेत.
– नयना गुंडे, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)