पीएमपीएमल बसच्या धडकेत एक जण ठार

पुणे-सातारा मार्गावर अपघात; गतिरोधक बसवण्याची मागणी
खेड शिवापूर – पुणे-सातारा महामार्ग ते कोंढणपूर दरम्यान आर्वी (ता. हवेली) फाट्या जवळील क्राफ्ट पॉवरकॉन कंपनी समोरील वळणावर भरदाव वेगाने येणाऱ्या पीएमपीएमल बसने दुचाकीला धडक दिली, त्यामध्ये दुचाकी चालक दीपक चिमाजी कांबळे (वय 45) यांचा जागीच मृत्यू झाला.
याबाबत राजगड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दिपक हा सकाळी मार्केट यार्ड येथे कामासाठी कोंढणपूर (ता. हवेली) येथून पुणे बाजूला निघाला होता. तो आर्वी (ता.हवेली) फाटा ओलांडून सदर कंपनीजवळ आला असता समोरून येणाऱ्या स्वारगेट-कोंढणपूर बस क्र. (एमएच 12 सीएच 4429) दिपक चालवत असलेल्या दुचाकी (क्र.एमएच 14 एफडब्लू 3769) हिला धडक दिल्यामुळे दुचाकीचालक बसच्या पुढच्या चाकाखाली पडला, त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला, त्या अवस्थेत त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषित केले. राजगड पोलिसांनी बस चालक सुखदेव विठ्ठल जाधव (रा. संतोषनगर, कात्रज, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी चालकास अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार बी.बी.कदम करीत आहे. सदर वळण हे अपघात स्थळ झाले आहे. याच ठिकाणी आत्तापर्यंत पाच ते सहा अपघात झाले असून कित्येकजण गंभीर जखमी झाले आहेत. या वळणावर एका बाजूस खासगी कंपनी तर दुसऱ्या बाजूस खोल खड्डा आहे, त्यामुळे अपघात होतात नागरिकांनी गतिरोधकाची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)