“पीएमपीएमएल’ : जड झाले ओझे!

    मुद्दा

 एकनाथ बागूल

“पीएमपी’ या नावाने सुरू असलेल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये शिस्त निर्माण व्हावी, अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात सार्वजनिक बसगाड्यांची लाजिरवाणी दुर्दशा कायमची थांबावी आणि प्रवाशांना वक्‍तशीर आणि स्वच्छ, आरोग्यदायी सुखकर प्रवासाची सोय उपलब्ध व्हावी, अशी माफक अपेक्षा पुणेकर बाळगून आहेत.

शिक्षण, आरोग्य आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था या तीन मूलभूत नागरी गरजा समजण्यात येतात; परंतु या तीनही क्षेत्रांत सामान्य करदात्या नागरिकांना येणारा अनुभव “स्मार्ट सिटी’ बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पुणे शहराच्या महानगरपालिकेला मुळीच शोभादायक नाही. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची कायदेशीर जबाबदारी मोठ्या अट्टहासाने स्वतःकडे घेणाऱ्या मनपाला अगदी प्रारंभापासून ही व्यवस्थासुद्धा सक्षमपणे चालविता आलेली नाही.

“पीएमपी’ या नावाने सुरू असलेल्या वाहतूक व्यवस्थेमध्ये शिस्त निर्माण व्हावी, अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात पुण्याच्या सार्वजनिक बसगाड्यांची लाजिरवाणी दुर्दशा कायमची थांबावी आणि प्रवाशांना वक्‍तशीर आणि स्वच्छ, आरोग्यदायी सुखकर प्रवासाची सोय उपलब्ध व्हावी अशी. माफक अपेक्षा बाळगून, अधुनमधून राज्यसरकारच्या पुढाकाराने या व्यवस्थेचा कारभार सक्षम सनदी अधिकाऱ्याकडे सोपविला जात असतो. परंतु, पीएमपीची सूत्रे कायदेशीर तरतुदीमुळे निर्वाचित लोकप्रतिनिधींच्या अधिकारातच समाविष्ट असल्याने शिस्तबद्ध आणि वक्तशीर प्रवासाची सुविधा पदरात पडण्यात सातत्याने अडचणीच निर्माण होत असतात.

कार्यक्षम सनदी अधिकाऱ्याच्या हातात या व्यवस्थेचा कारभार सोपविल्यास तेथील यांत्रिक व तांत्रिक स्वरूपाच्या मूलभूत शास्त्रीय गरजाच नव्हे तर बसगाड्या व सुट्या भागांची खरेदी, इंधन खरेदी, कर्मचारी भरती आणि आर्थिक स्वरूपाचे अन्य व्यवहार आदीबाबतही हितसंबंधी राजकीय घटकांना तेथे मुक्‍त हस्तक्षेप करण्यास आपोआप आळा बसतो, असे जाणकार गोटातून सातत्याने सांगण्यात येत असते. पीएमपीसह संपूर्ण पुणे महानगर परिवहन  महामंडळाच्या अध्यक्षपदावरून तुकाराम मुंढे या कार्यक्रम अधिकाऱ्याची अवघ्या वर्षभरातच अन्यत्र बदली करण्यात आल्याची ताजी घटना अलीकडेच पाहावयास मिळाली. त्यानंतर नियुक्त झालेल्या सनदी अधिकारी नयना गुंडे यांनाही पीएमपीच्या कारभारातील नेहमीच्या त्रुटींचा अनुभव सध्या घ्यावा लागत आहे.

अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी दोनच दिवसांपूर्वी काही मार्गांवर स्वतः बसमधून प्रवासाचा अनुभव घेतला. विशेषतः बीआरटी मार्गावरील बसगाड्यांची अवस्था, गाड्यांच्या ब्रेक डाऊनचे वाढते प्रकार, बसस्थानकावरील गैरसोयी, बीआरटी मार्गावर खासगी वाहनांची घुसखोरी, असे अनेक प्रकार स्वत: अध्यक्षांनी अनुभवले सुलभ व विनाअडथळा प्रवास आणि मुख्यतः प्रवाशांसाठी संबंधित सेवा सुलभतेने देण्यासाठी प्रशासनामार्फत दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च होत असतात. परंतु प्रत्यक्ष प्रवाशांच्या वाट्याला मात्र त्याबाबत गैरसोयींबरोबरच मनःस्तापही सहन करावा लागत असतो. पीएमपीचा कारभार सुधारण्याच्या नावाखाली संबंधित यंत्रणेचे नेतृत्व वेळोवेळी बदलण्याचा खेळ पुणे पालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे; त्यामध्ये सुधारणा मात्र होत नाही.

दरम्यान, पीएमपीच्या बसगाड्यांवरून वाहतुकीच्या नियमांचा भंग होण्याचे आणि त्याबद्दल पीएमपीला दंड ठोठावण्याची कारवाई पुणे पोलिसांनी सुरू केली आहे. शहरामध्ये असलेल्या पालिकेच्या वाहतूक व्यवस्थेची ही दयनीय अवस्था नागरिकांना नाईलाजाने खासगी वाहने बाळगण्यास प्रवृत्त करणारी ठरली आहे. शिवाय अशा स्थितीतही खासगी वाहनांच्या मालकांकडून पार्किंगच्या सोयीसाठी खुशाल भाडे वसूल करण्याची शक्कल पुणे पालिकेच्या कारभाऱ्यांच्या डोक्‍यातून निघाल्याचे आढळले आहे.

सार्वजनिक वाहतूकव्यवस्थेच्या वाढत्या दुर्दशेबद्दल नागरिकांकडून सतत टीकाटिपण्णी चालू असते. तरीही पुरेशा गांभीर्याने पालिका आणि राज्य सरकारकडून त्याची दखलच घेतली जात नाही. त्यासंदर्भात मुख्यतः मुंबई शहरातील “बेस्ट’ या आदर्श बससेवेचा मुद्दाम उल्लेखही केला जातो. त्या तुलनेत पुणे व परिसरातील बससेवेचा आवाका लहान असूनही तेथे ही व्यवस्था सदोदित आर्थिक तोटा आणि अकार्यक्षम, अस्वच्छ, त्रुटींची गर्दी अशा अलंकारांनीच नटलेली असल्याचे आढळते. संपूर्ण शहराच्या दृष्टीने लाजिरवाण्या ठरलेल्या अशा सार्वजनिक बससेवेचा कारभार एखाद्या नामवंत खासगी कंपनीकडे सोपविण्यात यावा, असे काही जाणकारांनाही सुचविले होते. परंतु शहर हितासाठी जास्तच जागरूक असलेल्या राजकीय लोकप्रतिनिधींनी त्या सूचनेला केराची टोपली दाखविली आहे. या परिस्थितीमुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरेशा कार्यक्षमतेने चालवण्याची जबाबदारी मनपाला झेपतच नाही, असे दिसते आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)