पीएमआरडीए मेट्रोचा “ग्राऊंड सर्व्हे’ सुरू

संग्रहित छायाचित्र

टाटा व सिमेन्स कंपनीसोबत होणार करार : 100 कर्मचारी पुण्यात

पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पाचे काम करण्याचा करारनामा लवकरच टाटा व सिमेन्स या कंपनीसोबत करण्यात येणार आहे. त्यानंतर टाटा सिमेन्सला वर्क ऑर्डर दिली जाणार आहे. या सर्व प्रक्रियेसाठी दोन महिन्यांचा कालावधी लागणार असून प्रत्यक्ष जानेवारीमध्ये पीएमआरडीएच्या मेट्रोचे काम सुरू होणार आहे. दरम्यान, टाटा व सिमेन्स कंपनीचे 100 कर्मचारी पुण्यात दाखल झाले असून ग्राऊंड सर्व्हेचे काम सुरू करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हिंजवडी येथील आयटी पार्कमध्ये अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या कार्यरत आहेत. या ठिकाणी दैनंदिन कामकाजासाठी सुमारे 2 लाख नागरीक येत असतात. वाहतूक कोंडीमुळे अनेक कर्मचाऱ्यांचा वेळ वाया जात आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर पीएमआरडीएने हिंजवडी ते शिवाजीनगर हा मेट्रो प्रकल्प हाती घेतला आहे. या मेट्रो प्रकल्पामुळे हिंजवडी येथील वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका होणार आहे. केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व शहर विकास मंत्रालयाने यापूर्वीच पीएमआरडीएच्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गास आणि स्थानकांना मान्यता दिली आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर हा मेट्रो मार्ग 23.3 किलोमीटर लांबीचा असून एकूण 23 स्थानके असणार आहेत. हा प्रकल्प राज्य शासनाने 18 जुलै 2018 रोजी महत्त्वाकांक्षी नागरी परिवहन प्रकल्प म्हणून घोषित केले आहे.

टाटा व सिमेन्स ही कंपनी पीएमआरडीए मेट्रोचे काम करण्यास पात्र ठरली आहे. त्यानुसार टाटा व सिमेन्स या कंपनीसोबत लवकरच करारनामा करणार आहे. तत्पूर्वी टाटा व सिमेन्सकडून या प्रकल्पासाठीची अनामत रक्कम जमा करून घेतली जाणार आहे. अनामत रक्कम भरल्यानंतर तसेच करारनामा झाल्यानंतर टाटा व सिमेन्स कंपनीला वर्क ऑर्डर दिली जाणार आहे. पुढील वर्षी म्हणजे जानेवारी 2019 मध्ये पीएमआरडीएच्या मेट्रोचे काम प्रत्यक्ष सुरू होईल, असा विश्‍वास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.

पीएमआरडीएच्या मेट्रोचे काम टाटा व सिमेन्स या कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीचे मुख्यालय युरोप येथे आहे. या कंपनीसोबत लवकरच करारनामा करण्यात येणार आहे. त्यानंतर या कंपनीला वर्क ऑर्डर दिली जाईल. जानेवारी 2019 मध्ये प्रत्यक्ष मेट्रोचे काम सुरू होईल. टाटा व सिमेन्स कंपनीचे सुमारे 100 कर्मचारी पुण्यात आले असून त्यांच्याकडून मेट्रो मार्गाची पूर्वपाहणी तसेच ग्राऊंड सर्व्हेचे काम सुरू करण्यात आले आहे.

– किरण गित्ते, आयुक्त, पीएमआरडीए

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)