‘पीएमआरडीए’ पुणेकरांसाठी बांधणार स्वतंत्र धरण

जागा पाहणी सुरू 


पाण्याचा प्रश्‍न सोडवण्याचा प्रयत्न

पुणे- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत वेगाने नागरीकरण होत आहे. या हद्दीतील नागरिकांना पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी प्राधिकरणाकडून आतापासून नियोजन करण्यात येत आहे. पाण्याची गरज लक्षात घेता प्राधिकरणाचे स्वत:चे धरण असावे, असा विचार पुढे आला आहे. त्यासाठी जागा पाहणी करण्याचे काम पीएमआरडीएने सुरू केले आहे.

पीएमआरडीएच्या हद्दीचे पाण्याचे नियोजन करण्यासाठी गेल्या वर्षीच पाणी वापर समिती स्थापन करण्यात आली आहे, या पाणीवापर समितीनेही पीएमआरडीएचे स्वत:चे धरण असावे, अशी शिफारस केली आहे. काही गावातील नागरिकांनी विशेषतः: सातारा रस्त्याच्या पश्‍चिमेकडील बाजूस असलेली गावे, तसेच सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या गावातील नागरिकांनी नैसगिकरित्या पाणी साठण्याची काही ठिकाणे सूचविली आहेत. विकास आराखड्याचे काम सुरू आहे. त्यामध्ये याचा विचार करण्यात येणार आहे.
– किरण गित्ते, आयुक्त, पीएमआरडीए

राज्य सरकारने मागील तीन वर्षांपूर्वी पीएमआरडीएची स्थापना केली. याचे क्षेत्र 7 हजार 357 चौरस किलोमीटर आहे. तर प्राधिकरणाच्या हद्दीत सुमारे 800 गावे समाविष्ट आहेत. भौगोलिक परिस्थितीचा विचार करता पीएमआरडीए हे देशातील तिसरे मोठे प्राधिकरण आहे. या मोठ्या क्षेत्राचा सुनियोजित विकास करण्यावर भर देण्यात येत आहे. सध्या प्राधिकरणाकडून विकास आराखडा (डीपी) तयार करण्याचे काम सुरू आहे. यामध्ये पाण्याचे नियोजनही समाविष्ट करण्यात येत आहे.

रिंगरोड, मेट्रो प्रकल्पाबरोबरच पहिल्या टप्यात दहा नगर योजनांची (टीपी स्कीम) कामे हाती घेण्यात येणार आहे. मात्र या सर्व भागाला खात्रीशीर आणि पुरेसा पाणी पुरवठा करण्याची सुविधा पीएमआरडीएकडे नाही. सध्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातूनच पाणी पुरवठा करण्याचे नियोजन आहे.

या पार्श्‍वभूमीवर पीएमआरडीएच्या हद्दीचे पाण्याचे नियोजन करण्यासाठी गेल्या वर्षीच पाणी वापर समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने देखील “एमएमआरडीए’च्या धर्तीवर पीएमआरडीएने स्वत:चे धरण बांधावे, अशी शिफारस केली आहे. सातारा रस्त्याच्या पश्‍चिमेकडील बाजूस असलेल्या काही गावातील नागरिकांनी या संदर्भात काही जागा सूचविल्या आहेत. तसेच पडीक तलावांची माहिती देखील उपलब्ध करून दिली आहे. ते उपयोगात आणले, तर 5 ते 6 टीएमसी पाणी उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे त्यांचा अभ्यास पीएमआरडीएकडून सुरू करण्यात आला आहे.

 

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)