पीएमआरडीए कार्यालयावर मूक मोर्चा

  • वाघोलीतील कामे 15 सप्टेंबरपर्यंत सुरु करणार असल्याचे आयुक्तांकडून स्पष्ट

वाघोली – वाघोलीतील नियोजित कामांना गती द्यावी तसेच श्रेयस मंगल कार्यालयापर्यंत पुणे-नगर गावठाण हद्दीतील रस्त्याचे काम निधी मंजूर असल्याने तातडीने सुरू करावे, या मागण्यांकरिता पीएमआरडीएच्या औंध येथील कार्यालयावर नगर रोड वाहतूक कृती समितीच्या वतीने आज (दि. 6) मूकमोर्चा काढण्यात आला.
या मोर्चामध्ये जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके, वाघोलीचे उपसरपंच संदीप सातव, माजी पंचायत समिती सदस्य सुरेश सातव, उद्योजक संपत गाडे, कृष्णकांत सातव, राजेंद्र सातव, संदीप थोरात आदी सहभागी झाले होते. वाघेश्वर मंदिर चौक, केसनंद फाटा चौक या दरम्यान एकूण 1300 मीटर लांबी संदर्भात 6 पदरी रुंदीकरण, फुटपाथ, दुभाजक, रेलिंग यासाठी पीएमारडीएकडून दि. 1 जुलै 2018ला ई-निविदा मागविण्यात आल्या होत्या. याची पुढील प्रक्रिया सुरू असून खासगी ठेकेदाराद्वारे रस्त्याचे काम दि. 15 जुलै पर्यंत सुरु होणार असल्याचे पत्र पीएमारडीएचे आयुक्त किरण गीते यांनी दिल्याने मोर्चासह आंदोलन मागे घेण्यात आले.
दरम्यान, वाघोलीचे उपसरपंच संदीप सातव यांनी सांगितले की, वाघोली येथे पीएमारडीएकडून दि. 15 सप्टेंबर पर्यंत प्रत्यक्षपणे कामाला सुरुवात झाली नाही तर सोमवारी (दि. 17) वाघोली येथे नगर रोड वाहतूक कृती समिती आणि ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

रखडलेले काम लवकरच – आमदार पाचर्णे
पोलीस, ग्रामपंचायत आणि गावातील तरुण वाघेश्वर मंदिर चौक, आव्हाळवाडी फाटा, केसनंद फाटा या तीन चौकांतील वाहतूक कोंडी सोडविण्यात मोलाची भूमिका बजावत आहेत. यापुढील काळातही वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. महामार्गावरील तीन चौकात पीएमआरडीएकडून करण्यात येणाऱ्या कामाचे टेंडर उघडण्यात आले असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. ठेकेदारांच्या तांत्रिक अडचणींमुळे मागील महिनाभरापासून रखडलेल्या या कामाला सुरुवात होणार असल्याचे नक्की झाले आहे.

ठेकेदार..टेंडर आणि डिपॉझिट…
पुणे-नगर महामार्गावर वाघोलीला ट्रॅफिकची जॅमची भेडसावणारी गंभीर सोडविण्यासाठी वाघोली गावात रस्ता रुंदीकरण करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत होती. त्यानुसार पीएमआरडीएने वाघेश्वर मंदिर चौक, आव्हाळवाडी फाटा, केसनंद फाटा या तीन चौकांचे विस्तारीकरण करून एक एक लेन वाढविण्याचे टेंडर काढले. टेंडर उघडल्यानंतर तीन ठेकेदारांनी टेंडर भरणे आवश्‍यक असताना दोनच ठेकेदारांचे टेंडर आले होते. पुन्हा एकदा टेंडर भरण्यात आले. पुन्हा टेंडर उघडले, आता ठेकेदाराचे डिपॉझिट भरून कामाला लवकरच सुरुवात होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)