पीएमआरडीएला पुण्याच्या हक्काचे 8 टीएमसी पाणी?

पाणी वापर समितीच्या निर्णयावर भविष्यातील पाण्याची स्थिती अवलंबून

पुणे – पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) क्षेत्राला पाण्यासाठी कोणतीही स्वतंत्र व्यवस्था नाही, त्यामुळे या भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी खडकवासला धरणसाखळीमधून पाणी देण्याची मागणी पीएमआरडीएकडून करण्यात आली होती. त्यावर निर्णय घेण्यासाठी राज्यशासनाकडून पाणी वाटपाबाबत निर्णय घेण्यासाठी स्थापन केलेल्या पाणी वापर समितीची पहिली बैठक येत्या शुक्रवारी होणार आहे.

पुण्याच्या पाणी वापरात काटकसर करून 8 टीएमसी पाणी पीएमआरडीएला देता येईल, असा अहवाल जलसंपदा विभागाकडून यापूर्वीच देण्यात आला आहे. तर महापालिकेने मात्र पुण्याच्या पाण्यात कपात करता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या समितीकडून काय निर्णय घेतला जाणार यावर पुणे शहराच्या भविष्यातील पाण्याची स्थिती अवलंबून असणार आहे. पीएमआरडीएकडून स्वतंत्र धरण बांधण्याची तयारी करण्यात आली होती. मात्र, ही बाब शक्‍य नसल्याने खडकवासला धरणसाखळीतून हे पाणी देण्याची मागणी करण्यात आली आहे.

पुणे शहराला खडकवासला, वरसगाव, पानशेत आणि टेमघर या धरणांतून पाणीपुरवठा होतो. त्याचबरोबर या धरणांमधून जिल्ह्यातील काही गावांबरोबरच शेतीला पाणी सोडले जाते. मात्र, गेल्या काही वर्षांत शहराची वाढ वेगाने झाल्याने या पाण्यावरून जलसंपदा विभाग आणि महापालिकेत शहरी आणि ग्रामीण अशा वादाला तोंड फुटले असतानाच; आता पीएमआरडीएनेही त्यांच्या हद्दीसाठी 3 टीएमसी पाण्याची मागणी केली आहे. त्यावर निर्णय घेण्यासाठी राज्यशासनाने नगरविकास खात्याचे प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची एक समिती नेमली आहे. ही समिती पाणी वाटपाबाबत नव्याने निर्णय घेणार आहे. या समितीची पहिली बैठक येत्या शुक्रवारी मुंबईत बोलविण्यात आली आहे. त्यासाठी शासनाने पुणे महापालिकेकडून सविस्तर माहिती मागविली असल्याचे पालिकेतील प्रशासकीय सुत्रांनी स्पष्ट केले.

जलसंपदा विभाग घोड्यावर?
धरणातील पाणीसाठा आणि शहर तसेच जिल्ह्याची मागणी पाहता, गेल्या काही वर्षांत ग्रामीण विरोधात शहर असा वाद सुरू आहे. असा वाद सुरू असतानाच; पाणी वाटपाचे अधिकार असलेल्या जलसंपदा विभागाने पीएमआरडीएला नवीन धरण बांधणे शक्‍य नसल्याचे सांगतानाच; पुणे आणि पिंपरी-चिंचवडचे 15 टीएमसी पाणी बचत झाल्यास उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवित जलसंपदा विभागाने पीएमआरडीए आणि महापालिकेत वादाची ठिणगी सोडली आहे. पुणे महापालिकेस 11.50 टीएमसी मंजूर आहे. महापालिका 16 ते 17 टीएमसी पाणी वापरते. त्यामुळे पालिकेने पाणी वाटपावर मर्यादा आणून बचत केल्यास 6 ते 7 टीएमसी पाणी वाचेल. तसेच भामा-आसखेड धरणातून दोन्ही महापालिकांना 5 टीएमसी पाणी मंजूर करण्यात आले होते. मात्र, ते न घेतल्याने हा पाणीसाठा रद्द झाला असून हे 5 टीएमसी आणि 1 हजार कोटी खर्च करून खडकवासला ते फुरसुंगीपर्यंत भुयारी मार्ग केल्यास सुमारे 2.9 टीएमसी पाणी बचत होईल. त्यामुळे पीएमआरडीएला 15 टीएमसी पाणी सहज उपलब्ध होईल, असा दावा या पूर्वीच केला आहे. मात्र, प्रत्यक्षात या समितीला अहवाल देताना पाणी बचत केल्यास 8 टीएससी पाणी देणे शक्‍य असल्याचे शासनास कळविले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)