‘पीएफ’ सक्‍तीच्या निर्णयाचे स्वागत

पिंपरी, (प्रतिनिधी) – गेली अनेक वर्षांपासून सफाई कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीपासून वंचित ठेवणाऱ्या ठेकेदारांना लगाम घालण्याचे आदेश स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी दिले आहेत. या निर्णयाचे कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायतीने स्वागत केले आहे. यामुळे कष्टकऱ्यांना न्याय मिळणार आहे, असे संघटनेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांची संख्या तीन हजारांपेक्षा अधिक आहे. या सर्व कामगारांना ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता काम करावे लागत आहे. मात्र, या कामाचा ठेका घेतलेल्या ठेकेदारांकडून कामगारांची पिळवणूक सुरू आहे. भविष्य निर्वाह निधी (पीएफ) सारखी सुविधा बंधनकारक असताना कामगारांचा हक्‍क ठेकेदारांकडून नाकारला जात होता. याबाबत संघटनेच्या वतीने वेळोवेळी आंदोलन करून या प्रश्‍नाकडे लक्ष वेधले, मात्र आतापर्यंत या प्रश्‍नाकडे फारसे गांभिर्याने पाहिले गेले नाही.

दरम्यान, संघटनेच्या वतीने हा प्रश्‍न आमदार लक्षमण जगताप यांच्याकडे मांडून याप्रश्‍नी कष्टकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची विनंती केली. त्यानुसार सर्व चक्रे हलली. सफाई कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी दिल्याशिवाय ठेकेदारांची बिले देऊ नयेत, असे स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी प्रशासनाला आदेश दिले आहेत. त्यानुसार ठेकेदारांची बिले तपासण्याचे काम सुरू असून सफाई कर्मचाऱ्यांना ही सुविधा नाकारणाऱ्या ठेकेदारांची बिले अदा केली जाणार नाहीत. हे सर्व कर्मचारी हक्‍काच्या भविष्य निर्वाह निधीपासून 2010 पासून वंचित आहेत. महापालिकेने स्वतंत्रपणे या प्रकरणाची तपासणी सुरू असून यामुळे भविष्य निर्वाह निधीच्या माध्यमातून कष्टकऱ्यांना त्यांच्या हक्‍काची रक्‍कम मिळणार असल्याबद्दल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्‍त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)