पिस्तुलाचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळीचा म्होरक्‍या जेरबंद

कामशेत- कामशेतजवळ पिस्तुलाचा धाक दाखवून लुटणारा टोळी प्रमुख बाबाजी अरुण गायकवाड (वय 25, रा. कांब्रे, तालुका मावळ) याच्या मुसक्‍या पोलिसांनी आवळल्या. न्यायालयाने आरोपीला 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तळेगाव-दाभाडे येथील जनलक्ष्मी स्मॉल फायनान्स बॅंकेचे वसुली अधिकारी अतुल रमेश चौधरी 17 मे रोजी वडीवळे गावात पैसे गोळा करून तळेगावला जात असताना वडीवळेतील संगमेश्‍वर मंदिराजवळ चार इसमांनी त्यांना अडवून बाजूला नेऊन हात-पाय बांधून पिस्तुलाचा धाक दाखवून यांच्याकडील बायोमेट्रिक मशीन, सॅमसंग टॅब, मोबाईल, डेबिट कार्ड व रोख रक्कम 1लाख, 77 हजार 710 रुपये जबरीने चोरले होते.

कामशेत पोलिसांनी याप्रकरणी सोनु काळूराम गायकवाड, नागेश केशव गायकवाड (दोघे रा.कांब्रे) यांना 17 ऑगस्टला पकडले होते. यावेळी दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली होती. अधिक चौकशी करून पोलिसांनी सतीश चंद्रकांत ओझरकर (रा. ओझर्डे) याला 20 ऑगस्टला येरवडा कारागृहातून वर्ग केले होते. मुख्य आरोपी बाबाजी अरुण गायकवाड (वय 25, रा. कांब्रे तालुका मावळ, जिल्हा पुणे) हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. तो कांब्रे गावामध्ये येणार असल्याची खात्रीलायक बातमी मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक नीळकंठ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बी. बी. पाटील, पोलीस शिपाई नवनाथ शेंडगे, विराज कामठे, उमेश मुंडे, संतोष घोलप, समीर शेख, चंद्रकांत पवार यांनी आरोपीवर पाळत ठेवून कांब्रे येथून मंगळवार दि. 23 रोजी रात्री साडेसातच्या सुमारास ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक एअर गन, दुचाकी व रोख रक्कम जप्त केली. या आरोपीवर कामशेत पोलीस ठाणे, वडगाव पोलीस ठाणे, लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये जबरी चोरी, दरोडा आदी गुन्ह्याची नोंद आहे, अशी माहिती कामशेत पोलिसांनी दिली. पोलीस उप निरीक्षक बी. बी. पाटील पुढील तपास करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)