पिस्तुलं, गावठी कट्टा विक्रीचा जिल्ह्यात छुपा बाजार

पोलीसांपुढे आव्हान; उत्तरप्रदेश आणि मध्य प्रदेशातील गावांत एजंटांचे जाळे

राजेंद्र काळभोर

-Ads-

लोणीकाळभोर,- पुणे शहरासह ग्रामीण भागात गुन्हेगारी वाढत असून नवीन टोळ्या तसेच गुन्हेगारांची पैदास होत आहेत. पुणे शहरात तीन ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडल्यानंतर त्यातील आरोपी दौंड रेल्वे स्टेशनवर पकडण्यात पोलीसांना यश आले. तसेच, जिल्ह्याच्या पूर्व पट्ट्यात मागील काही महिन्यांत घडलेल्या गोळीबारांच्या घटनांमुळे पिस्तुल, गावठी कट्टे ग्रामीण भागात सहज उपलब्ध होत असल्याचे उघड होत असताना मोठ्या गुन्ह्यांचे धागेदोरही ग्रामीण भागाशी जोडले जात असल्याचे काही घटनांतून पुढे येत आहे. गेल्या काही वर्षात पुणे जिल्ह्यात विनापरवाना शस्त्र विक्रीचा छुपा बाजार मोठ्या प्रमाणात चालत असल्याचे समोर आले आहे. दहा ते 25 हजार रुपयांपर्यंत पिस्तुलं मिळत असून पिस्तुल विक्री करणारा परप्रांतिय एजंट आपल्याकडचा मुख्य एजंट आणि त्यानंतर थेट विक्री करणारा अशा साखळीत हे काम चालत असल्याचेही उघड झाले आहे.
पुणे जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक संदिप पाटील यांच्या आदेशा नुसार व अपर पोलीस अधीक्षक संदिप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी शाखेकडील पथकांची नेमणूक करून करण्यात आली आहे. याच पार्श्‍वभुमीवर गुन्हेगारीला पायबंद घालण्याकरिता स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख नवनियुक्त पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट विशेष मोहीम राबवित आहेत, त्यांनी दिलेल्या माहिती प्रमाणे विनापरवाना शस्त्र विक्रीचा धंदा राज्याच्या शहरीच नव्हे तर ग्रामीण भागातही जोरदार चालतो आहे. त्यांनी आजपर्यंत केलेल्या कारवाईत एकूण 42 पिस्तुलं, गावठी कट्टे जप्त केले आहेत. यानुसार माहिती घेतली असता. पुणे जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत विनापरवाना शस्त्र वापरणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. तसेच, वेगवेगळ्या पद्धतीचे पिस्तुलं, गावठी कट्टे आदी शस्त्रे सहज उपलब्ध असल्याने जुनी शस्त्रे छोट्या-मोठ्या गुन्हेगारांना स्वस्तात विकणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. अशा पद्धतीने चालत असलेल्या छुप्या बाजारात अशा घातक शस्त्रांची मोठी उलाढाल होत असल्याचेही उघड झाले आहे.
पुणे जिल्ह्यात प्रामुख्याने उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातून पिस्तुलं आणि गावठी कट्टे येत असल्याचे जग जाहीर आहे. मात्र, हा धंदा परप्रांतियांच्या माध्यमातून इतक्‍या छुप्या पद्धतीने चालविला जात आहे की, यावर नियंत्रण ठेवणे पोलिसांपुढेही आव्हान ठरत असले तरी करण्यात आलेल्या कारवाईत पकडलेल्या आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार पुणे शहर तसेच ग्रामिण भागात मिळणारी बेकायदा पिस्तुले ही मध्य प्रदेशातून येत असल्याचे समोर आले. त्यानंतर उत्तर प्रदेश, छत्तीसगड, बिहार येथुनही बेकायदा शस्त्रे येत आहेत.
जिल्ह्यात येणारी पिस्तुलं आणि गावठी कट्टे मध्य प्रदेशातील बडवानी, उमरटी गावात तयार झालेली असतात, या सगळ्या गावातच पिस्तुलं, कट्टे तयार करण्याच्या छोट्या कंपन्या आहेत. विशेष म्हणजे या गावांतील घरातील किमान एक-दोघांवर बेकायदा शस्त्र विक्रीचे गुन्हे दाखल आहेत, यामध्ये महिलांचाही समोवश आहे. यात शिक्षाही झालेल्या आहेत. परंतु, हा धंदा कमी झालेला नाही. उलट तो वाढतच असून हा धंदा रोखणे हे पोलीसांपुढे मोठे आव्हान ठरत आहे.

  • मध्य प्रदेशात पिस्तुलाचे कारखाने…
    मध्य प्रदेशातील नवलपुरा, सतीपुरा, गारी, सिरवेल, काजलपुरा, अंबा, सिगनूर, बडवानी जिल्ह्यातील उमरटी, ओझर, शाहपुरा, रामगढी, खुरमाबाद, उंडीखोदर, अंजड, ओसवाडा, दावलबेडी येथे पिस्तुले बनविण्याचे छोटे-मोठे कारखाने आहेत. एका विशीष्ठ समाजातील लोक हा धंदा करतात, शस्त्रं तयार करणे हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय असल्याचे सांगितले जाते. अगदीत किरकोळ रकमेत पिस्तुल तयार करण्यात येत असल्याने बाहेरील राज्यात नेवून त्याची विक्री केली जाते. पुणे येथील गुन्ह्याच्या पार्श्‍वभुमीवर पुणे पोलिसांनी मध्य प्रदेशात जाऊन तेथील कारखान्यांवरही कारवाई करीत आरोपींना अटक केली आहे. मात्र, तेथील स्थानिक प्रशासनाकडून अभय दिले जात असल्यानेही हा धंदा अनेक राज्यात फोफावला असल्याचे सांगण्यात आले.
  • जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्याकरिता वरिष्ठांच्या सुचनांनुसार विशेष मोहिम आखण्यात आली असून याकरिता विशेष पथकेही तयार आहेत. विनापरवाना शस्त्र तसेच विक्री करणाऱ्यांवर कारवाई करणे हा त्यातील एक महत्त्वाचा भाग आहे.
    – पद्माकर घनवट, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)