पिण्याच्या पाण्यावर होणार सखोल संशोधन

भूजल सर्वेक्षण वडगाव परिसरात विभाग उभारणार राज्यस्तरीय प्रयोगशाळा

पुणे – पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेचे निरीक्षण, त्याचे प्रमाण, दर्जाची तपासणी आणि आवश्‍यक उपाययोजना आता अधिक अद्ययावत होणार आहेत. यासाठी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा राज्यस्तरीय प्रयोगशाळा उभारणार आहे. वडगाव परिसरात 6 गुंठे परिसरात हा प्रकल्प प्रस्तावित असून अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सोयीसुविधांयुक्त या प्रयोगशाळेत पाण्यासंबंधी अधिक सविस्तर अभ्यास होणार आहे.

 

काही ठिकाणी संसाधनांच्या अभावामुळे पाण्याचे अधिक विस्तृत मूल्यांकन करणे अवघड होते. तसेच विभागीय स्तरावरील माहिती एकत्रितपणे अभ्यासणे थोडे किचकट होत असे. यासाठी राज्यस्तरावर एक प्रयोगशाळा उभारण्याची मागणी केली जात होती. या प्रयोगशाळेमुळे पाण्याचे नमुने संकलित करून त्यांचे सखोल संशोधन आणि त्यानुसार धोरण ठरविण्यास मोठी मदत होणार आहे.
– शेखर गायकवाड, संचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा ही विविध योजनांच्या माध्यमातून राज्यातील भूजल संसाधनांच्या अन्वेषण, विकास आणि वाढीशी निगडीत आहे. यात मुख्यतः पाणीपुरवठा करणाऱ्या भूजल स्रोतांचा शोध, भूजल पातळीसाठी कृत्रिम “रिचार्ज’ प्रकल्प यासंदर्भात अभ्यास केला जातो. तसेच विशिष्ट अभ्यास संबंधित ग्रामीण पाणीपुरवठा कार्यक्रमाअंतर्गत नागरिक आणि प्रशासन अधिकारी यांना बोर, विहिरी-ट्यूबवेलचे ड्रिलिंग, अल्पवहन सिंचन यांबाबत तांत्रिक मार्गदर्शन दिले जाते.

सध्या विभागांतर्गत राज्यात 6 प्रादेशिक, 34 जिल्हास्तरीय तसेच 138 उपविभागीय प्रयोगशाळा आहेत. यामध्ये 10 नवीन विभागीय प्रयोगशाळा प्रस्तावित आहेत. यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने भूजल पातळी आणि पाण्याची गुणवत्ता यांची महिती संकलित केली जाते. तसेच भूगर्भातील पाणी वापराचे नियमन करण्यासाठी आणि भूगर्भीय पाणी विकासविषयक कायद्यांचे शास्त्रीय आधारावर नियमन करण्यासाठी नियमितपणे भूजलाचे मूल्यांकन करण्यात येते. या प्रयोगशाळेसाठी एकून 10 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. येत्या जूनपासून प्रयोगशाळेचे काम सुरू होणार असून, दोन वर्षात ही प्रयोगशाळेचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे, असे सांगण्यात आले.

प्रयोगशाळेची वैशिष्टये :
अद्ययावत उपकरणांद्वारे पाण्याच्या नमुन्यांची चाचणी.
पाण्यातील कीटकनाशके, जड खनिजे यांचे प्रमाण अभ्यासता येणार.
पाण्यातील बॅक्‍टेरियांचा अभ्यास करता येणार.

पाणी प्रयोगशाळांची संख्या
6 – प्रादेशिक
34-जिल्हास्तरीय
138- उपविभागीय प्रयोगशाळा
10 – नवीन विभागीय प्रयोगशाळा प्रस्तावित


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)