सुपा – श्रीगोंदा तालुक्यातील पिंप्री कोलंदर येथे विचार मंथन आश्रमाच्या वतीने आध्यात्मासह इतर सामाजिक ज्वलंत प्रश्नांवर प्रकाश टाकताना प्रबोधनात्मक व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
ह.भ.प. बाळासाहेब महाराज धोत्रे यांच्या संकल्पनेतून जनजागृतीपर आयोजित केलेल्या विचार मंथन अखंड हरिनाम सप्ताहास उत्साहात प्रारंभ झाला. बुधवार दि.16 ते मंगळवार दि.22 या सप्ताह कालावधीत दररोज काकडा, ज्ञानेश्वरी पारायण, नाम, जप यज्ञ, सत्संग, प्रवचन, हरिपाठ, व्याख्यान आणि संगीत भजन आदी धार्मिक कार्यक्रम होणार असून दररोज सायंकाळी 7 ते 9 या वेळेत विविध सामाजिक विषयांवर नामवंताची व्याख्याने होणार आहेत.
बुधवार दि.16 रोजी बालरोग तज्ञ डॉ. सतिष आंधळे यांचे स्त्री भ्रूण हत्या टाळा आणि बालकांचे संगोपण या विषयावर व्याख्यान पार पडले. गुरुवार दि.17 रोजी अहमदनगर जि.प. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे या महिला सबलीकरणावर बोलणार आहेत. शुक्रवार दि.18 रोजी कृषीतज्ञ रविंद्र वाघ हे शेती विषयक माहिती सांगणार आहेत. शनिवार 19 रोजी योगाचार्य अनंत झांबरे हे प्रात्यक्षिकासह योग व प्राणायामाचे धडे व माहिती देणार आहेत. रविवार दि.20 रोजी ऍड. संभाजी बोरुडे यांचे लोकशाहि आणि भारतीय समाजाची मानसिकता या विषयावर व्याख्यान होईल. सोमवार दि. 21 रोजी प्रा.पद्माकर पंडीत हे शिक्षक आणि विदयार्थी यांच्या सहसंबंधाबाबत बोलणार आहेत तर मंगळवार दि.22 रोजी शिव व्याख्याते केशव कातोरे हे आपल्या व्याख्यानातून महापुरुषांचे महत्व विशद करणार आहेत. बुधवार दि. 23 रोजी सकाळी 9 ते 11 या वेळेत ह.भ.प. बाळासाहेब महाराज धोत्रे यांचे काल्याचे किर्तन होणार असून उद्योजक सचिन कातोरे यांच्या महाप्रसादाच्या कार्यक्रमाने सप्ताहाची सांगता होईल.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा