पिंपळे जगतापमध्ये खासगी विकसकाविरुद्ध ग्रामस्थांचे उपोषण

  • अतिक्रमण करुन ओढा बुजविणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी : पाणीपुवरठा योजना धोक्‍यात येणार

शिक्रापूर – पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील असलेल्या ओढ्यावरील पाण्यावर गावासह अनेक संस्था, कंपन्या यांचा पाणीपुरवठा अवलंबून असताना देखील या गायरानात अतिक्रमण करून ओढा बुजविण्यात आला आहे. खासगी विकासाकामुळे गावचा सार्वजनिक पाणीपुरवठा धोक्‍यात येत आहे. त्यामुळे पिंपळे जगताप येथील ग्रामस्थांनी रविवारी (दि.13) ओढा आणि पाझर तलाव पूर्ववत सुरू करण्यासाठी उपोषण व ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.
पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथे सरकारी गायरान जमीन गट नंबर 60 मध्ये 1972 च्या दुष्काळात रोजगार हमी योजनेतून येथील जमीन गट नंबर 56, 57, 58, 59, 60 जमिनीमध्ये नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहावर ओढा असल्याने त्यावर लाखो रुपये खर्चून बंधारा बांधण्यात आला आहे. तसेच खोलीकरण करून पाझर तलाव बांधलेला आहे. या पाझर तलावावर शासनाच्या तसेच जिल्हा परिषदेच्या वतीने दोन कोटी रुपये खर्चून पिंपळे जगताप गावची पाणीपुरवठा योजना उभारली आहे. तर, या तलावामुळे परिसरातील भूगर्भातील पाण्याची पातळी टिकून राहत आहे. पाणी पुरवठ्याचा उपयोग केंद्र शासनाच्या जवाहर नवोदय विद्यालय, कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार, आय. ओ. के. कॉलेज यासह इतर दहा ते पंधरा कंपन्यांना होत असतो. परंतु ही जमीन गट नंबर 58 चे जमिनीचे मालक यांनी मुरमाचे बेकायदा उत्खनन करून ओढ्यात भराव टाकून तो बुजविलेला आहे. तर जमीन गट नंबर 58 चे मालक यांनी गायरानात अतिक्रमण केले असून त्यांच्याविरुद्ध गेली महिनाभर ग्रामपंचायत, महसूल तसेच पोलिसांत तक्रारी अर्ज दाखल केले आहेत. त्यानंतर तहसीलदार शिरूर यांनी स्थळ पाहणी करून बेकायदा उत्खनन थांबवून ओढा पुन्हा सुरु करण्याचे आदेश दिले होते. परंतु या मालकाने चार पोकलेन, डंपर यांच्या सहाय्याने ओढा बुजविण्याचे काम सुरूच ठेवले आहे. त्यामुळे हा ओढा बुजविण्याचे कामकाज हे शासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमताने सुरु असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते चंदनराव सोंडेकर, नंदकुमार शितोळे, मोहन टाकळकर, अशोक नाईकनवरे, ऋषिकेश थिटे, बाबाजी शिनलकर, सुभाष जगताप, सागर शितोळे, अक्षय सोंडेकर, हनुमंत टाकळकर, सचिन भालेराव, महेश जगताप, अशोक बेंडभर, निलेश फडतरे, अभिषेक शिंदे, राजेंद्र तांबे, राहुल सोंडेकर, निलेश जगताप, सागर सोंडेकर, नामदेव बेंडभर, कैलास बेंडभर, सुखदेव खेडकर, बाळासाहेब भुजबळ, मोहन भुजबळ, अशोक जगताप, विजय जगताप यांसह शेकडो ग्रामस्थांनी उपोषण तसेच ठिय्या आंदोलनात सहभागी घेतला.

  • आंदोलकांच्या मागण्या
    तर हा ओढा बुजाविणाऱ्यावर तसेच पाणीपुरवठा धोक्‍यात आणणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी. जमीन गट नंबर 58 च्या मालकावर गुन्हा दाखल व्हावा. गौण खनिजाचा 40 पट दंड आकारला जावा. उत्खननात वापरलेले पोकलेन, जेसीबी, डंपर जप्त करून वाहनमालकांवर गुन्हे दाखल करावेत यांसह आदी मागण्या या आंदोलकांनी केल्या आहेत.

पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथे आम्ही सुरु केलेले आंदोलन हे आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तो पर्यंत सुरूच ठेवणार आहे. हा ओढा बुजविला तर पुढील काळामध्ये पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आम्ही मागे हटणार नाही.
– चंदनराव सोंडेकर, सामाजिक कार्यकर्ते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)