शिक्रापूर- पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालयात गुरूवारी (दि.12) पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सेवाधाम च्या विशेष मुलांनी टाळ आणि मृदुंगाच्या ठेक्‍यावर ताल धरुन विठू नामाचा गजर केला. तसेच गोल रिंगण आणि उभे रिंगण करुन पालखी सोहळ्याचा आनंद लुटला. वारकऱ्यांच्या वेशाभूषेसह पताकाधारी पथकाचा समावेश लक्ष वेधून घेत होते.
पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालयातील मुलांनी आयोजित केलेल्या पालखी सोहळ्यात पालखी दरम्यान “झाडे लावा, झाडे जगवा’, “वृक्षवल्ली आम्हा सोयरे’, “पाणी अडवा, पाणी जिरवा’ असे विविध फलक विशेष विद्यार्थ्यांनी हाती घेऊन नागरिकांना अनोखा संदेश दिला. पालखी सोहळ्यात विशेष मुलांचा उत्साह वाढविण्यासाठी शिरुर पंचायत समितीच्या प्रभारी सभापती मोनिका हरगुडे यांचा सहभाग महत्त्वाचा ठरला. तर, यावेळी रामदास दरेकर यांच्या वतीने विद्यार्थ्याना शालेय साहित्य आणि अन्नधान्य वाटप केले. याप्रसंगी शिरुर पंचायत समितीच्या प्रभारी सभापती मोनिका हरगुडे, माजी सरपंच अजित दरेकर, माजी उपसरपंच बाबा दरेकर, शुभांगी पायमोडे, सोनाली शिनगारे, संजय पोटफोडे यांसह आदी शिक्षक उपस्थित होते. विद्यालयातील शिक्षकांनी मुलांची पालखी सोहळ्याकरीता तयारी करुन घेतली होती. तर मुख्याध्यापक पवन कट्यारमल यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)