पिंपळवंडीत टोमॅटोच्या पिकाला साड्यांचा मंडप

उष्णतेपासून पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा नवा फंडा

बेल्हे- जुन्नर तालुक्‍यात दिवसेंदिवस उन्हाच्या तापमानाचा पारा वाढत असून, उन्हापासून पिकांचा बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांना धडपड करावी लागत आहे. बेल्हे, आणे, राजुरी परिसरात यावर्षी तापमानाचा पारा चाळीसच्यावर गेल्यामुळे पिके वाचवण्यासाठी शेतकरी वेगवेगळे प्रयोग करीत आहेत. पिंपळवंडी येथे तर टोमॅटोचे पीक वाचवण्यासाठी सावलीसाठी पिकावर साड्यांचा मंडप घातला आहे.
पिंपळवंडी (ता. जुन्नर) गावातील लेंडी स्थळचे शेतकरी रवींद्र सबाजी लेंडे या शेतकऱ्याने एक एकर क्षेत्रावर टोमॅटोची लागवड केली आहे. यातील अर्धा एकरवर नवीन लागवड असून तीव्र उन्हापासून रोपांचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी रोपांवर साड्यांचा मंडप तयार केला आहे.या मंडपाच्या सावली निर्माण केल्यामुळे टोमॅटोच्या रोपांचे कडक उन्हापासून संरक्षण झाल्यामुळे टोमॅटोची रोपे चांगली तरारली असल्याचे पहावयास मिळत आहे.पिंपळवंडी परिसरात अशाप्रकारे वेगळा प्रयोग राबवल्यामुळे शेतकरी रवींद्र लेंडे यांचे पीक कुतूहलाचा विषय बनला आहे.

राजुरी परिसरात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर टोमॅटो पिकाची लागवड केली आहे. यावर्षी पाण्याचे प्रमाण कमी असल्यामुळे टोमॅटो पिकाला चांगला भाव मिळण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. गतवर्षी वीस किलो टोमॅटोच्या कॅरेटला 250 रुपये भाव होता.

यावर्षी टोमॅटो पिकाकडून शेतकऱ्यांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. जुन्नर तालुक्‍याच्या पूर्व भागात बेल्हे, आणे, राजुरी, बोरी बुद्रुक, माळवाडी जाधववाडी, वडगाव कांदळी, पिंपळवडी परिसरात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात टोमॅटो पिकाची लागवड केली आहे. सुमारे 150 एकरावर लावलेल्या टोमॅटो पिकाचे चाळीसच्यावर गेलेल्या पाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. यात प्रामुख्याने झाडांची मर होणे, पाने वाकडी होणे,आकसली जाणे… असा परिणाम होत असल्यामुळे नवीन लागवड केलेल्या टोमॅटोच्या बागेला सर्वात जास्त परिणाम होत असल्यामुळे शेतकरी टोमॅटो बागेचे उन्हापासून संरक्षण होण्यासाठी वेगवेगळे प्रयोग राबवत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)