पिंपळगाव जोगासाठी शेतकऱ्यांचा ‘रास्ता रोको’

देवीभोयरे फाटा येथे तब्बल 5 तास आंदोलन

निघोज – पिंपळगाव जोगा कालव्यातून सुरु असलेल्या आवर्तनाचा एक थेंबही अद्याप पारनेर तालुक्‍याच्या हद्दीत पोहचला नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आज देविभोयरे फाटा येथे तब्बल पाच तास रास्ता रोको आंदोलन केले.

आवर्तन सुटून पंथरा दिवस झाले असताना पुणे जिल्ह्याच्या हद्दीतच पाणी सोडले जात होते, त्यामुळे पारनेर तालुक्‍यातील पिकांचा व पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्‍न उपस्थित झाल्याने पारनेरचे शेतकरी रस्त्यावर उतरले. अवघ्या काही तासात पारनेरच्या शेतकऱ्यांना पोलीस बंदोबस्तात पाणी देण्यात येईल, असे आश्‍वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

पिंपळगाव जोगा कालव्यातून रब्बीसाठी आवर्तन सोडण्यात आले. यासाठी पारनेरकरांना मोठा संघर्ष करावा लागला. आमदार विजय औटी यांनीही यासाठी अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. तर मंत्री गिरीष महाजन यांनाही पारनेरच्या शिष्टमंडळाने भेट घेवून पाण्याची मागणी केली. मात्र आवर्तन सुरु होवून पंधरा दिवस लोटले तरी पुणे जिल्ह्यातील पुढाऱ्यांच्या आदेशाने हे पाणी पारनेर तालुक्‍यात पोहचत नव्हते. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज मंगळवारी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष विश्‍वनाथ कोरडे, वडझिरेचे सरपंच शिवाजी औटी व संतोष काटे यांच्या नेतृत्वाखाली अळकुटी, गारखिंडी, लोणीमावळा, बाभुळवाडे, रांधे, दरोडी, देविभोयरे व वडझिरे गावातील रास्ता रोको आंदोलन केले.

आवर्तन सोडताना प्रशासनाने खबरदारीची उपायोजना न केल्याने पुणे जिल्ह्यातच हे पाणी सुरू राहीले. पिंपळगाव जोगा कालव्यातून आवर्तन सुटणार असल्याने पारनेर तालुक्‍यातील हजारो शेतकऱ्यांनी कांदा व जनावरांचा चारा-पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली, मात्र पाणी आमच्यापर्यंत पोहचत नसल्याने अनेक पिके जळू लागली तसेच या परिसरातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला. यास जबाबदार असणाऱ्या आधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी केली. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष विश्‍वनाथ कोरडे, सरपंच शिवाजी औटी, संतोष काटे आदींची भाषणे झाली. मात्र पिंपळगाव जोगा धरणाचे आभियंता कानडे यांनी आम्ही पारनेरच्या हद्दीत पाणी सोडण्याची प्रत्यक्ष कारवाई सुरु केली असून त्यासाठी आवश्‍यक पोलीस बंदोबस्त मागविला आहे. येत्या काही तासातच पाणी देण्यासाठी प्रशासन कटीबद्ध राहील, अशी ग्वाही दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)