पिंपळगाव-खडकी ग्रामपंचायतीचे सदस्य अंकुश पोखरकर यांचे पद रद्द

तिसरे अपत्य असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आदेश

मंचर- आंबेगाव तालुक्‍यातील पिंपळगाव-खडकी येथील ग्रामपंचायतीचे सदस्य अंकुश मारुती पोखरकर यांना तीन अपत्ये असल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आल्याचा निर्णय जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिला आहे; परंतु जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची ग्रामपंचायतीने पायमल्ली केली असून अद्याप त्याची अंमलबजावणी केली नसल्याचा आरोप अर्जदार राहुल भागुजी पोखरकर यांनी केला आहे.
मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 14 (ज 1) अन्वये ज्या व्यक्तीस 12 सप्टेंबर 2001 नंतर तिसरे अपत्य झाले असेल अथवा त्या व्यक्तीच्या अपत्यांमध्ये भर पडली असेल अगर तिसरे अपत्य जन्माला आले असेल, अशी व्यक्ती ग्रामपंचायत सदस्य म्हणून अपात्र ठरविण्याबाबतची तरतुद आहे. त्यानुसार पिंपळगाव येथील अर्जदार राहुल पोखरकर यांनी ग्रामपंचायत सदस्य अंकुश मारुती पोखरकर यांच्या तिसऱ्या अपत्याचा जन्म 22 मे 2018 रोजी झाला असल्याचे पुराव्यासह जिल्हाधिकारी यांना लेखी पत्र दिले आहे. त्यानुसार ग्रामपंचायत सदस्य अंकुश मारुती पोखरकर यांना ग्रामपंचायत सदस्यपदी कार्यरत राहण्यास अपात्र ठरविण्यात आल्याचा निकाल 27 नोव्हेंबर 2018 रोजी देण्यात आला; परंतु जिल्हाधिकाऱ्यांच्या निकालपत्रानंतरही ग्रामपंचायतीच्या मासिक सभांना अंकुश पोखरकर उपस्थित असल्याने राहुल पोखरकर यांनी आश्‍चर्य व्यक्त केले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या निकालाची अवहेलना होत असल्याचा आरोप करुन या प्रकाराची चौकशी करावी, अन्यथा पंचायत समिती घोडेगाव कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा राहुल पोखरकर यांनी दिला आहे. दरम्यान, ग्रामपंचायतीचे सदस्य अंकुश पोखरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निकालाविरोधात अपिल केल्याचे सांगितले. ग्रामविकास अधिकारी जनार्दन नाईकडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निकालाची प्रत 10 डिसेंबर 2018 रोजी ग्रामपंचायतीला मिळाली आहे. तथापि अंकुश मारुती पोखरकर यांनी अपिलाची प्रत ग्रामपंचायतीला न दिल्याने त्यांना मासिक सभेस बसण्यास मज्जाव केल्याचे सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)