पिंपरी महापालिकेत समावेशासाठी आळंदीकरांचा रेटा

पिंपरी- शहरात नागरी सुविधा पुरविण्यात अपयशी ठरलेल्या आळंदी नगरपरिषदेचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश करावा, अशी आग्रही मागणी नागरिक करू लागले आहेत. किमान शुद्ध पाणी आणि चांगले रस्ते तरी मिळतील, एवढी माफक अपेक्षा आहे. अनेक नागरिक आता उघडपणे ही मागणी करू लागले असून, याकरिता लवकरच नागरिकांची स्वाक्षरी मोहीम राबविली जाणार आहे.

आळंदी नगरपरिषदेची स्वातंत्र्यपूर्व 1869 साली ब्रिटीशकाळात स्थापना झाली असून, 1911 साली नगरपरिषदेची इमारत बांधण्यात आली आहे. आता ही इमारत मोडकळीस आली असून, प्रशासकीय कार्यालयाचे स्थलांतर जुन्या टाऊन हॉल इमारतीमध्ये करण्यात आले आहे. आळंदीची लोकसंख्या 20 हजारांच्या आसपास असून, संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या संजीवन समाधी दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या 10 ते 15 हजार एवढी आहे.

संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली अलंकापुरी अवघ्या देशाच्या वारकरी सांप्रदायाच्या सर्वोच्च भक्‍तीस्थानी आहे. आषाढी आणि कार्तिकीवारीला राज्य-परराज्यातून लाखो भाविक याठिकाणी नतमस्तक होण्यासाठी येत असतात. मात्र, नुकत्याच पार पडलेल्या कार्तिकी यात्रा काळात राज्य सरकारकडून 1 कोटी 59 लाख रुपये अनुदान मिळूनही, भाविकांना पुरेशा प्रमाणात पाणी देखील पुरविण्यात नगरपरिषदेला अपयश आले. त्यामुळे यात्राकाळात अनेक ठिकाणची सार्वजनिक शौचालये पाण्याअभावी कुलूप लावून बंद ठेवावी लागली. “सोशल मीडिया’वर याची छायाचित्रे “व्हायरल’ झाली होती. हिच परिस्थिती सार्वजनिक दिवाबत्तीची रहिली. भर एकादशीच्या दिवशी नगरपरिषद चौकाबरोबरच जुन्या पुलावरील सार्वजनिक दिवे बंद होते. याचा भाविकांना त्रास सहन करावा लागला. घनकचरा व्यवस्थापनाबाबत नगरपरिषद अद्यापही समाधानकारक कामगिरी करू शकलेली नाही. पाच कोटी खर्चून बांधलेला जलशुद्धीकरण प्रकल्प फेल गेला आहे.

भामा- आसखेड धरणातून पुणे महापालिकेला वाघोलीपर्यंत नेल्या जाणाऱ्या पाईपलाईनचे काम आळंदीत बंद पाडल्याने, करुळीत जॅकवेलच्या माध्यमातून आरक्षित पाणी देण्याचा तोडगा काढण्यात आला होता. मात्र, या पाईपलाईचे काम पूर्ण होऊनही, त्यावर अद्यापही निर्णय प्रलंबित आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहे पाडून, त्याठिकाणी भाजी मंडई वसविण्यात आली आहे. याचा शेजारच्या शासकीय रुग्णालयातील रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे.

आळंदीत येणाऱ्या भाविकांना सुविधा पुरविताना नगरपरिषदेच्या नाकी नऊ येतात. मात्र, ब्रिटिशकालीन घटनेतच उल्लेख नसल्याने मंदीर परिसर वगळता बाहेर निधी खर्च करता येत नसल्याचे कारण ज्ञानेश्‍वर महाराज संस्थानकडून दिले जाते. आळंदीचे नगराध्यक्ष आळंदीतील संत ज्ञानेश्‍वर महाराज संस्थानावर पदसिद्ध सदस्य असावेत, ही नागरिकांची प्रलंबित मागणी आहे. मात्र, जिल्हा सत्र न्यायालयाच्या अखत्यारित चाललेल्या संस्थानच्या कारभारात आळंदीकर ग्रामस्थांना अद्यापही “नो एन्ट्री’ च आहे.

आळंदीचा पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत समावेश करण्यासाठी राष्ट्रवादीच्या काळात प्रयत्न झाला होता. मात्र आळंदीतील राजकीय पुढाऱ्यांच्या विरोधामुळे हा प्रयत्न बारगळला. सध्या आळंदी नगरपरिषदेत 17 नगरसेवक असून, पिंपरीत समावेश झाल्यास आळंदीतून किमान तीन नगरसेवक निवडून जाऊ शकतात. त्यामुळे आपले राजकीय वर्चस्व कायम ठेवण्यासाठीच या समावेशाला विरोध केला जात आहे.

हद्दी शेजारीच लखलखाट, प्रशस्त रस्ते
आळंदीला खेटूनच पिंपरी-चिंचवड महापालिकेची हद्द आहे. या हद्दीत येताच प्रशस्त गुळगुळीत रस्ते, शुद्ध पाणी आणि इतर नागरी सुविधा आहेत. आळंदीत येणारे भाविक देखील पिंपरी महापालिका हद्दीतील रस्त्यांची तोंडभरुन स्तुती करतात. मात्र, आळंदीत येताच प्रशस्त रस्ते सोडाच, शुद्ध पाणी देखील मिळत नसल्याची खंत व्यक्त करतात. महापालिकेच्या हद्दीतील नळावरून अनेक आळंदीकरांना पिण्यासाठी शुद्ध पाणी आणावे लागते, ही वस्तुस्थिती आहे.

आळंदीकरांना मुलभूत सोयी-सुविधा पुरविण्यात नगरपरिषद अपयशी ठरत आहे. 1 कोटी 59 लाखांचे यात्रा अनुदान येऊनही, भाविकांना पिण्याचे पाणीदेखील नगरपरिषद पुरवू शकली नाही. तिर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत सुरू असलेली कामे देखील निकृष्ट दर्जाची आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश करण्यासाठी नागरिकांची स्वाक्षरी मोहीम राबवून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल सी. विद्यासागर यांना आळंदीकरांच्या वतीने निवेदन देणार आहोत.
– संदीप नाईकरे, सामाजिक कार्यकर्ते.

नगरपरिषदेचे काम समाधानकारक असून, ते विरोधकांना सहन होत नाही. कार्तिकी यात्राकाळात भाविकांना पुरेशा प्रमाणात नागरी सुविधा पुरवून, आम्ही त्यांची सेवा केली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेशाची भाविकांची तक्रार आहे की, विरोधकांचे दुखणे आहे. ज्यांना काही काम धंदा नाही, अशी नसती उठाठेव करणाऱ्या व्यक्‍तींकडून हे प्रकार केले जात आहेत.
– वैजयंता उमरगेकर, नगराध्यक्षा, आळंदी नगरपरिषद


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)