पिंपरी पोलिसांकडून 18 गुन्हे उघडकीस

पिंपरी – पिंपरी पोलिसांनी एकूण 18 गुन्ह्यात 13 आरोपींना अटक केली असून 14 लाख 38 हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे.

आयुब नजीर शेख (वय-23), मस्तान अहमद कुरेशी (वय-23) सलमान मेहबूब शेख (वय-22), रफिक अब्दुल शेख (वय-19), सिद्धीक आताकुरेहमान शेख (वय-23), नियाज जमीर शेख (वय-21), नवशाज नजीर शेख (वय-20, सर्व रा. देहूरोड), विकास सुनील घोडके (वय-21, रा. वडगाव शेरी, पुणे), कुलदीप तानाजी शिंदे (वय-20, रा. चंदननगर), सलमान गौसशेख (वय-24), राहुल हिरालाल भांडेकर (वय-20, दोघे रा. पिंपरी), राहुल उर्फ भडज्या अर्जुन गोरे (वय-24, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), स्वप्नील उर्फ बाळू नामदेव शेलार (वय-26, रा. दत्तनगर, चिंचवड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पिंपरीतील एका चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना सहायक निरीक्षक सतीश कांबळे यांना आरोपींविषयी माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आयुब शेख, मस्तान कुरेशी या दोघांना अटक केली. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्यांची कबुली देत त्यांच्या साथीदारांची नावे उघड केली. त्यानुसार सलमान शेख, रफिक शेख सिद्धीक शेख, नियाज शेख, नवशाज शेख यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल असलेले दरोडा आणि जबरी चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आणले आहेत. 40 ग्रॅम सोन्याचे दागिने, 72 हजार रुपये, तीन दुचाकी, चार मोबाईल असा पाच लाख 67 हजार रुपयांचा ऐवज त्यांच्याकडून जप्त केला आहे. तर इतर तीन साथीदारांचा शोध सुरु आहे.

दुसऱ्या एका कारवाईत कर्मचारी महादेव जावळे यांना खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीवरून विकास घोडके आणि कुलदीप शिंदे या दोघांना अटक करण्यात आली. यांच्याकडून घरफोडीचे चार आणि सोनसाखळी चोरीचा एक गुन्हा उघडकीस आला. यामध्ये 20 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह सहा लाख 65 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. तर पोलीस नाईक श्रीकांत जाधव, रोहित पिंजरकर यांना खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार सलमान गौसशेख याला अटक करून तपास केला असता त्याच्याकडून एक लाख 55 हजार रुपये किंमतीच्या चोरीच्या पाच दुचाकी जप्त केल्या आहेत. तसेच राहुल भांडेकर याला अटक करून एक मोबाइल आणि घड्याळ असा 13 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

पिंपरी मिलिंदनगर, रामनगर येथे पोलिसांनी कोम्बिग ऑपरेशन करत तडीपार गुन्हेगार अर्जुन गोरे याला अटक करून त्याच्याकडून सात हजार किंमतीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला. तर तडीपार गुन्हेगार स्वप्नील शेलार याला अटक करून 31 हजार रुपये किंमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)