पिंपरी-चिंचवड शहरातील विद्यार्थिनी जागतिक पातळीवर चमकली

निगडी – पिंपरी-चिंचवड शहराची मुग्धा वाव्हळ ही 13वर्षांची विद्यार्थीनी जागतिक पातळीवर चमकली आहे. नुकत्याच इजिप्त येथे झालेल्या युआयपीएम बायथल आणि ट्रायथल 2018 वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धांमध्ये मुग्धा वाव्हळचा (वय 13 वर्षे) समावेश असलेल्या संघाने ब्रॉन्झ मेडल (कांस्य पदक) पटकावले.

जागतिक पातळीवरील बायथल आणि ट्रायथल स्पर्धांमध्ये भारतीय संघात पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने प्रतिनिधित्व करणारी मुग्धा वाव्हळ ही सिटी प्राईड स्कूल, निगडी या शाळेतील इयत्ता आठवीची विद्यार्थिनी आहे. ट्रायथल ब्रॉन्झ मेडल विजेत्या पंधरा वर्षांखालील मुलींच्या गटात अनन्या नामदे (पुणे) आणि सायली गांजळे (मंचर) या विद्यार्थिनींचा समावेश होता. इजिप्त येथे झालेल्या स्पर्धांमध्ये सुमारे सत्तावीस देश सहभागी झाले होते. यात भारतीय संघात नऊ ते एकोणीस या वयोगटातील बावीस खेळाडूंचा सहभाग होता. बालेवाडी येथे झालेल्या नवव्या मॉडर्न पेंटॅथलॉन राष्ट्रीय अजिंक्‍यपद स्पर्धेतील कामगिरीनुसार भारतीय खेळाडूंची निवड करण्यात आली होती.

-Ads-

ऑलम्पिक स्पर्धांच्या नियम आणि निकषांवर घेण्यात आलेल्या बायथले आणि ट्रायथल स्पर्धांमध्ये चारशे मीटर धावणे, पंचवीस मीटर पोहणे याच्या चार फेऱ्या आणि नेमबाजीच्या पाच फेऱ्यांचा समावेश असतो, म्हणजे एकूण सोळाशे मीटर धावणे, शंभर मीटर पोहणे आणि नेमबाजीचे पाच शॉटस्‌ शिवाय चार वेळा लेझर शूटिंग असे स्पर्धेचे स्वरूप असते. शारीरिक आणि मानसिक क्षमता पणाला लावून एका सेकंदापेक्षाही कमी वेळातील चुरशीने यातील विजेतेपद खेळाडू खेचून आणत असतात.

याबाबत अधिक माहिती देताना मुग्धाचे वडील महेश वाव्हळ यांनी सांगितले की, स्पर्धात्मक खेळांमध्ये सहभागी होण्याचा कोणताही वारसा आमच्या घरात नव्हता. परंतु वयाच्या पाचव्या वर्षापासून मुग्धाची खेळातील आवड आणि नैपुण्य लक्षात आल्याने आम्ही तिला विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्यास उद्युक्त केले. स्थानिक, जिल्हा आणि राज्य पातळीवरील विविध स्पर्धांमध्ये तिने पारितोषिके मिळवली. गेल्या वर्षी स्पेनमध्ये झालेल्या बायथल आणि ट्रायथल जागतिक स्पर्धांमध्ये तिला भारतीय संघातून प्रतिनिधित्व करता आले. ऑलिंम्पिक स्पर्धांमध्ये भारतीय संघाकडून खेळण्याचे स्वप्न पाहणारी मुग्धा दररोज किमान पाच तास क्रीडा सरावासाठी वेळ देते. इजिप्त येथील स्पर्धेतील यशामागे जितेंद्र खासनीस यांचे प्रशिक्षण आणि सुरेश काकड, प्रवीण यादव यांचे मार्गदर्शन; तसेच सिटी प्राईड स्कूल-निगडीच्या मुख्याध्यापिका माया सावंत यांचे सहकार्य मोलाचे ठरले असल्याचे ते म्हणाले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)