पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अंदाजपत्रक सादर

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे 2018-19 चे सुधारित 4 हजार 33 कोटींसह 2019-20 चे 37 वे एकूण 4 हजार 62 कोटींचे अंदाजपत्रक महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड यांना सादर केले. यामध्ये मागील अंदाजपत्रकातील 1390 कोटी शिल्लक रकमेचा समावेश आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या या अंदाजपत्रकामध्ये शहराला पर्यावरणपूरक करण्यावर भर देण्यात आला आहे. शहरातील नागरिकांची जीवनशैली उचाविण्यासाठी तसेच पिंपरी-चिंचवड शहर एक उच्च दर्जाचे राहण्यायोग्य शहर बनविण्यासाठी शाश्‍वत विकासाला प्राधान्य देऊन,त्यानुसार उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी ग्रीन सिटी ही संकल्पना राबविली जाणार आहे. शहरात पर्यावरणपूरक ग्रीन बिल्डिंगची रेटींग सिस्टीम तयार करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. त्याकरिता महापालिका प्रशासनाने यापुर्वीच अशा सोसायट्यांना मालमत्ता करात घसघसीत सवलत जाहिर केली आहे.

त्याशिवाय नागरिकांनी सार्वजनिक वाहतुकीचा अधिक प्रमाणात वापर करावा, याकरिता प्रशस्त रस्ते, पादचाऱ्यांना चालण्यासाठी पदपथ आणि शेअर-ए- सायकलसारखे उपक्रम राबविले जाणार आहेत. तसेच नागरिकांनी विनावाहन दिवस पाळण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठी उद्याने आणि पर्यावरण विभागांकरिता 83 कोटी 24 लाख 92 हजार 600 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

ही संकल्पना राबविण्यासाठी वर्षभरात 950 ग्रीन बस खरेदी करणार आहे. या सर्व बस ग्रीन फ्युअल, सीएनजी, बायो-सीएनजीवर चालणाऱ्या असतील. त्याचबरोबर 150 इलेक्‍ट्रिक बस खरेदी केल्या जाणार आहेत. त्यापैकी 25 बस पीएमपीच्या ताफ्यात दाखल झाल्या असून, उर्वरित 125 बस लवकरच खरेदी केल्या जाणार आहेत. त्याकरिता 190 कोटी 82 लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

याशिवाय पाण्याचा पुनर्वापर करण्यावर भर दिला जाणार आहे. याकरिता सांडपाणी पुनर्वापराचे धोरण मंजुर असून, या वर्षापासून त्यावर प्रभावीपणे काम केले जाणार आहे. शहरातील कचरा गोळा करून तो मोशी कचरा डेपोपर्यंत वाहून नेण्यासाठी महापालिका 350 कोटी खर्च करत आहे. त्याऐवजी ग्रीन सिटी संकल्पनेअंतर्गत सोसायट्यांमधील कचरा सोसायटीच्या आवारातच जिरविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यामुळे या खर्चामध्ये बचत होईल, हा मागील हेतू आहे.

2019-20 या आर्थिक वर्षात 4,620 कोटी उत्पन्न अपेक्षित आहे व त्यात प्रत्यक्षात खर्च 4,590 कोटी होईल व मार्च 2020 अखेर 30 कोटी इतकी शिल्लक राहणार आहे. शहराचा सर्वांगिण विकास करणे, शहरातील प्रत्येक नागरिकाला शहराची ओळख निर्माण करण्यासाठी विकास धोरणात समाविष्ट करणे, शहर विकासासाठी आवश्‍यक परिणामांची वेगवान अंमलबजावणी करणे, चिरस्थायी पर्यावरणपूरक शहर आणि शहराची वेगळी ओळख निर्माण करणे ही चतु:सुत्रीचा अवलंब केला आहे. पारदर्शी, गतीमान व नागरिक केंद्रीत महानगरपालिका स्थापन करणे, जीआयएस आधारित ईआरपी चा वापर सुरु करणे, कॅशलेस पेमेंट करिता सुविधा निर्माण करणे, स्मार्ट सिटी अंतर्गत स्मार्ट पाणीपुरवठा, स्मार्ट मलनि:सारण, स्मार्ट घनकचरा व्यवस्थापन, स्मार्ट पार्किंग, स्मार्ट मोबिलीटी, स्मार्ट शिक्षण आणि स्मार्ट आरोग्य सुविधा इत्यादी योजनांचा वापर करणे यावर भर दिला आहे. तसेच ग्रीन बिल्डींग रेटींग सिस्टीम निर्माण करणे, पर्यावरणपूरक सोसायट्या निर्माण व्हाव्या, याकरिता स्पर्धा आयोजित करुन विजेत्यांना करात सूट देणे, नागरवस्ती विभाग व समाजकल्याण विभागामार्फत वैयक्तीक लाभाच्या योजना राबवून थेट खात्यात लाभ उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)