पिंपरी-चिंचवड तुझा भाजपवर भरोसा नाय का?

 

पिंपरी-पिंपरी-चिंचवडच्या जनतेने ऐतिहासिक सत्तांतर करुन भाजपला बहुमताने सत्ता दिली, परंतु मागील सहा महिन्यांचा कारभार पाहता शहरवासियांना मुलभूत सोयी-सुविधा पुरविण्यात सत्ताधारी अपयशी ठरत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड तुझा भाजपवर भरोसा नाय का? असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा कारभारी कोण? प्रशासनाचा कारभार कोण हाकणार? यावरुन काही दिवसांपासून भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये कलगीतुरा रंगू लागला आहे. पक्षाच्या वतीने अंतर्गत विवादाला पदाधिकाऱ्यांनी अजून चव्हाट्यावर येऊ दिला नाही. यात नागरिकांचे प्रश्‍न मात्र रेंगाळत असल्याचे सत्ताधाऱ्यांचे ही लक्षात येऊ लागले आहे. मुलभूत सोयी-सुविधाबाबत महापौर, सत्तारुढ पक्षनेते आणि स्थायी समिती सभापतीने स्वतंत्र बैठका घेवून आढावा घेतला. मात्र, ढिम्म प्रशासन त्यांना विशेष काही दाद देताना दिसत नाही. सर्व अधिकारी बघतो, करतो, कामे चालू आहेत, अशा प्रकारे टाळत आहेत. त्यामुळेच अखेर महापालिकेच्या कारभाऱ्यांना पाचारण करावे लागले. त्यांनी स्वच्छता, आरोग्य, पाणी पुरवठा, शिक्षण, वाहतूक आदी प्रश्‍नावर चर्चा करुन तातडीने उपाययोजना करण्याचा सूचना दिल्या.

एवढे करून ही कारभारात सुधारणा कधी होणार? याची ही आता वाट पहावी लागत आहे. त्यामुळे शहरातील सामाजिक संघटनाही मुलभूत प्रश्‍नावर पालिकेला जाब विचारु लागल्या आहेत. यामध्ये नागरी हक्क सुरक्षा समितीने सत्ताधारी भाजप व प्रशासनावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. यामध्ये शहरातील सर्व रस्त्यांची झालेली दुरवस्था, खोळंबलेली वाहतुक व्यवस्था, उड्डाणपूल निर्मिती व रुंदीकरणाच्या नावाखाली नियमित वाहतूक व्यवस्थेत केलेला बदल, अंतर्गत रस्त्याची रखडलेली कामे, नाले सफाईत केवळ घोषणाच, प्रशासनाने कामे फक्त कागदावरच, शुद्ध, उच्च दाबाने व नियमित पाणीपुरवठा कधी करणार? 25 % पथदिवे आजही बंद अवस्थेत, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा वाजलेत, बहुतांश बस थांब्याची अवस्था दयनीय झाली आहे, अशा प्रकारचे आरोपांची भाजप आणि प्रशासनवर झोड उठत आहे.

जागोजागी रस्त्यावर साचू लागलेले कचऱ्याचे ढीग, कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे, साथीच्या आजारांमध्ये वाढ होत आहे. शेकडो नागरिकांना स्वाईन फ्लू, डेंग्यू, मलेरिया अशा आजारांची लागण झाली आहे. आजपर्यंत 37 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, लस, औषधांचा तुटवडा जाणवत आहे, या प्रश्‍नावर वारंवार नागरिकांनी तक्रारी करूनही प्रशासन हालचाल करीत नाही. दरम्यान, पालिकेच्या शाळांच्या इमारती, तेथील स्वच्छता, प्रसाधन गृहे विध्यार्थ्यांना द्यावयाची शिक्षणोपयोगी साधने याबाबत सत्ताधारी व प्रशासन उदासीन आहे. तसेच, शहरातील खेळाची मैदाने, सार्वजनिक प्रसाधन गृहे, विशेषत: महिलांसाठी स्वच्छतागृहे, अपंगासाठी सुविधा, हॉकर्स झोन हे प्रश्‍न अजूनही प्रलंबित आहेत.

आयुक्‍तांवर भरोसा हाय?
शहरातील करदात्या नागरिकांना महापालिकेने रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण, वैद्यकीय सुविधा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि करमणूक अशा मुलभूत सुविधा मिळायला हव्यात. परंतु, नागरिकांना सुविधा ऐवजी मनस्ताप मिळत आहे. मुलभूत सुविधाही मिळत नसतील तर करदात्यांचा पैसा जातोय कुठे? असा सवाल ही नागरिक उपस्थित करत आहेत. नागरिकांना आयुक्‍तांकडून अजूनही बऱ्याच अपेक्षा आहेत. या सर्व राजकारणातून आणि अनागोंदी कारभारातून मार्ग काढत मुलभूत सुविधांकडे लक्ष द्यावे अशी मागणी सर्व स्तरातून होत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)