पिंपरी-चिंचवडला 10 इलेक्‍ट्रिक बस

पिंपरी– पर्यावरणपूरक असलेल्या एकूण 25 एसी इलेक्‍ट्रिक बस पीएमपीएमएलच्या ताफ्यात लवकरच दाखल होणार आहेत. त्याकरिता या बसची शहराच्या विविध मार्गावर चाचणी सुरू असून, महापौर राहुल जाधव, आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या बसची गुरुवारी (दि.29) चिखलीत चाचणी घेण्यात आली. या बसविषयी खात्री झाल्यानंतर भाडेतत्वावर 10 बस शहराच्या विविध मार्गांवर सोडल्या जाणार आहेत.

पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका तसेच पुणे व पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी यांचे 60:40 च्या दायित्व प्रमाणात पीएमपीएमएलला इलेक्‍ट्रिक बसेस देण्यात येणार आहेत. यातील नऊ मीटर मिडी एसी बसची चाचणी घेण्यात आली. या बसची बॅटरी क्षमता, पूर्ण चार्ज केल्यानंतर मिळणारे किलोमीटर, प्रवासी आसनक्षमता, कंफर्ट, एसी इफेक्‍ट, सस्पेंशन, ऑटो ट्रान्समिशन, मोबाईल चार्जिंग याबाबतची माहिती महापौर जाधव व आयुक्त हर्डीकर यांनी घेतली. दस्तुरखुद्द महापौर राहूल जाधव यांनी ही बस दहा किलोमीटर चालवून चाचणी घेतली.

पहिल्या टप्प्यात नऊ मीटर लांबीच्या 25 तर 12 मीटर लांबीच्या 125 बस भाड्याने घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नऊ मीटर लांबीच्या बसची आसनक्षमता 31 आहे. ही बस डाव्या बाजूच्या दरवाजाची असल्याने, या बसचा वापर बीआरटी मार्गिकेत करता येणार नाही. मात्र 12 मीटर लांबीच्या बसला उजव्या बाजूचे देखील दरवाजे असल्याने, या बसचा वापर बीआरटी मार्गिकेत केला जाणार आहे.

निगडी आगारात “चार्जिंग पॉइंटस्‌’
या बसेस पुणे येथे भेकराईनगर डेपो व पिंपरी-चिंचवडमध्ये निगडी डेपो येथे या बसेसच्या “चार्जिंग’ची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. या बसेसच्या “चार्जिंग’साठी अंदाजे तीन तास लागतात. एका “चार्जिंग’मध्ये मार्गावरील सर्व थांबे घेतल्यानंतर 183 किलोमीटर “ऍव्हरेज’ मिळाला आहे. तर अर्ध्या तासाच्या “चार्जिंग’मध्ये 50 ते 60 किलोमीटरपर्यंत ही बस धावू शकते. दररोज 225 किलोमीटर अंतर पार करण्याची क्षमता असून विना थांबा 250 किलोमीटर “एसी’सह धावू शकते. याकरिता ठेकेदाराला प्रति किलोमीटर 40 रूपये 32 पैसे दर प्रस्तावित आहे.

तिकीट दरात फरक नाही
या बसची हैदराबादस्थित इलेक्‍ट्रोमॅक या कंपनीत बांधणी होत असून, ऑर्डर दिल्यानंतर पाच महिन्यांत या 25 बस पीएमपीएमएलच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. शहरातील विविध मार्गांवर सोडल्या जाणाऱ्या या सर्व बस वातानुकुलित असल्या, तरी देखील मार्गावरील तिकीट दरात कोणतीही वाढ केली जाणार नाही. त्यामुळे प्रवाशांना अधिक रक्कम न मोजता वातानुकुलीत बसमधून प्रवासाची संधी मिळणार आहे.

पर्यावरणपूरक बसचे फायदे
ही बस पर्यावरणपूरक असल्याने, केवळ “चार्जिंग’वर ही बस धावणार असल्याने अन्य कोणताही खर्च येणार नाही. हा “चार्जिंग’चा खर्च देखील ठेकेदाराला करावा लागणार आहे. “ऑटोमॅटीक’ बसमुळे कोणतेही प्रदूषण होणार नसल्याचा दावा पीएमपीएमएल प्रशासनाने केला आहे. शहरातील नागरिकांचे आरोग्य उत्तम ठेवण्यात हातभार लागणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)