पिंपरी-चिंचवडमध्ये “सर्जिकल स्ट्राईक’ कधी?

विष्णू सानप

पिंपरी – पुणे व पिंपरी-चिंचवडकरांची पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (पीएमपीएमएल) ही मुख्य सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे. मात्र पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराला वेगळा न्याय दिला जात असल्याने पिंपरी-चिंचवडकर व येथील लोकप्रतिनिधी “पीएमपी’च्या कारभारावर कमालीचे नाराज आहेत. पुण्याकडून 60 तर पिंपरी-चिंचवडकडून 40 टक्‍के निधी “पीएमपी’ला मिळतो. मात्र, प्रवाशांना सुविधा देण्यापासून ते अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बेशिस्त कारभारापर्यंत प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. पुण्यात कारवाई करुन शिस्तीचा बडगा उगारणाऱ्या “पीएमपी’च्या अध्यक्षा नयना गुंडे पिंपरी-चिंचवडमध्ये “सर्जिकल स्ट्राईक’ कधी करणार याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात निगडी, भोसरी व पिंपरीतील नेहरुनगर असे तीन मुख्य आगार आहेत, मात्र सर्वच आगारात बसेसच्या “ब्रेक डाऊन’ची बोंब कायम आहे. आगारात नुसत्या संख्येने गाड्या आणि फेऱ्या कागदावर “भल्याभक्कम’ आहेत. “पीएमपी’ गाड्यांचे “ब्रेकडाऊन’चे प्रमाण दिवसें-दिवस कमी होण्याऐवजी वाढतच जात असून त्यात सुधारणा करण्याऐवजी आगारातील अधिकारी वर्ग व आगारप्रमुख लपवा-छपवी करत आहेत. तर काही कर्मचारी कंत्राटी कामगारांवर दबाव टाकत असून नादुरुस्त गाड्या त्यांच्या हाती सोपवत असल्याने त्या गाड्या रस्त्यावरच बंद पडत आहे. यामध्ये प्रवाशांची ससेहोलपट होत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील विभागीय कार्यालयाला एका छोट्या कार्यालयात काम करावे लागते. यामध्ये कोणत्याही सोयी-सुविधा नसल्याने पास अथवा इतर कामासाठी गेलेल्या नागरिकांना कार्यालयात उभे राहण्यासाठी सुद्धा जागा नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. मागील सोमवारी (दि. 3) पीएमपीएमएलच्या अध्यक्षा नयना गुंडे यांनी पुण्यातील भोकराईनगर आगारास अचानक भेट दिली आणि तेथील सतत गैरहजर असणाऱ्या व कामात दिरंगाई करणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांचे निलंबन करत त्यांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश दिले. पिंपरी-चिंचवड शहरातील आगारांमध्येही असे अनेक कामचुकार अधिकारी व कर्मचारी आहेत. त्यांच्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असून प्रवासी सेवेत अनेक अडथळे येत आहेत. गुंडे यांनी याठिकाणीही “सरप्राईज व्हिजीट’ देत बेशिस्तीला चाप लावण्याची गरज आहे.

पुण्याच्या लोकप्रतिनिधींनी तक्रारी करताच “पीएमपी’ प्रशासन त्वरीत प्रतिसाद देते. मात्र, पिंपरी-चिंचवडच्या महापौरांनी पत्र पाठवून 15 दिवस झाले तरी त्याची दखल घेतली गेली नाही. याबाबत नुकत्याच झालेल्या महापालिका सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी नाराजी व्यक्त करत पिंपरी-चिंचवडला मिळत असलेल्या दुजाभावाच्या वागणुकीबद्दल संताप व्यक्त केला होता. “पीएमपी’ प्रशासनाविरोधातील पिंपरी-चिंचवडमधील लोकप्रतिनिधींची ओरड आजची नाही. ज्या-ज्या वेळी पीएमपीला निधी देण्याची वेळ येते तेव्हा सर्वपक्षीय रोष व्यक्त केला जातो. मात्र, “पीएमपी’ प्रशासन या तक्रारी एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देत असल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील चौफेर नागरीकरण वाढत असताना शहरातील अनेक अंतर्गत भागात “पीएमपी’च्या बसेस नाहीत. सरासरी उत्पन्नाचे कारण देत शहरातील काही मार्गावरील बस “पीएमपी’ प्रशासनाने बंद केल्या आहेत. लोकप्रतिनिधींना विचारात न घेता बंद केलेल्या या बसेसमुळे विद्यार्थी व नोकरदार वर्गाला प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. नेहरुनगर “पीएमपी’ आगारात जवळपास निम्या बस नादुरुस्त असून बंदच आहेत. या प्रश्‍नाला दैनिक “प्रभात’ने वारंवार वाचा फोडली. मात्र, “पीएमपी’ प्रशासन कुठलीच सुधारणा करत नाही. आगारातील “ड्युटी किपर’पासून ते इतर अधिकारी कंत्राटी कामगारांवर दबाव टाकून त्यांची पिळवणूक करत आहेत. नादुरुस्त गाड्या रस्त्यावर काढण्यासाठी चालक आणि वाहकांवर दबाव टाकला जात आहे. नयना गुंडे यांनी पिंपरी-चिंचवडमधील आगारांना अचानक भेट देवून येथील कारभाराचा पंचनामा करण्याची मागणी होत आहे.

भोकराईनगर येथे तपासणी करत असताना काही कर्मचारी जास्त वेळ गैरहजर राहत असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. यापुढेही अशा बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाई होणारच आहेत. पिंपरी-चिंचवड परिसरातील आगारांना सुद्धा अशाप्रकारे अचानक भेटी दिल्या जातील. या ठिकाणच्या अडचणी जाणून घेण्यासाठी लवकरच एक विशेष बैठक बोलवण्यात येणार आहे.
– नयना गुंडे, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालिका, पीएमपीएमएल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)