पिंपरी-चिंचवडच्या पाण्यावरही “संक्रांत’?

पिंपरी – पुण्यापाठोपाठ पिंपरी-चिंचवडकरांच्या पाणी उपशावरही “संक्रांत’ येण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. महापालिकेने 440 एमएलडी पाणी उपसा करून पाणी काटकसरीने वापरण्याचा सूचना पाटबंधारे खात्याने केल्या आहेत. मात्र, पाणी कपातीबाबत सत्ताधाऱ्यांमध्ये एकमत होत नसल्याने महापालिकेकडून 500 एमएलडी पाणी उपसा सुरू आहे. दररोज 60 एमएलडी पाण्याचा जादा उपसा होत असल्याने पाणी वितरण व्यवस्थेवर परिणाम होण्याची भिती आहे.

लोकसंख्येच्या मानाने पुणे महापालिका आवश्‍यकते पेक्षाही अधिक पाणी जलसंपदा विभागाकडून घेत असल्याच्या तक्रारीची महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने गंभीर दखल घेतली आहे. पाणी उपशाविरोधातील निर्बंधाबाबत पुणे महापालिकेने केलेले अपिल जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने फेटाळून लावले आहे. त्यामुळे दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची वेळ पुणे महापालिकेवर आली आहे. पुणे महापालिकेवर आलेल्या या संक्रांतीमुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेचेही धाबे दणाणले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यंदा पावसाळ्याच्या अखेरीस पवना धरण क्षेत्रात अपेक्षेप्रमाणे परतीचा पाऊस झाला नाही. धरणात सध्या उपलब्ध असलेला पाणी साठा पुढील वर्षी जुलैअखेरपर्यत पुरविण्यासाठी आत्तापासूनच पाण्याचा काटकरीने वापर करणे अत्यावश्‍यक आहे. त्यामुळे पालिकेने दररोज 470 ते 500 एमएलडी पाणी उपसा न करता 440 एमएलडी पाणी उचलावे. पाणी वापराचे काटेकोरपणे नियोजन करावे, असे पत्र पाटबंधारे विभागाने पालिकेस नोव्हेंबरच्या सुरूवातीला पाठविले आहे. मात्र, अद्यापही महापालिकेने पाणी उपसा कमी केलेला नाही.

महापालिका दररोज सुमारे 500 एमएलडी पाणी रावेत बंधाऱ्यातून उपसा करते. हे पाणी शुद्ध करून संपूर्ण शहराला पाणी पुरवठा केला जातो. पाटबंधारे विभागाच्या पत्रानुसार पालिकेकडून तत्पर कार्यवाही अपेक्षित होती. दररोज तब्बल 60 एमएलडी पाणी कमी झाल्याने शहराचा पाणी वितरण व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे उन्हाळ्यात तीव्र स्वरुपाची पाणी टंचाई निर्माण होऊन नागरिकांच्या तक्रारी वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे पालिकेकडून पाणी कपातीची अंमलबजावणी करून पाणी बचतीची अंमलबजावणी केली जाऊ शकते. मात्र, याबाबत धोरण ठरविण्यात सत्ताधाऱ्यांमध्येच एकमत होत नसल्याचे चित्र आहे. त्यात विरोधकांच्याही विरोधाची भर पडली आहे. अशा परिस्थितीत एकीकडे पाटबंधारे विभागाचे आदेश तर दुसरीकडे राजकीय विरोध अशा कात्रीत महापालिका प्रशासन सापडले आहे.

असे आहेत पाणी कपातीचे पर्याय
महापौर राहुल जाधव यांच्या आदेशानंतर पाणी पुरवठा विभागाने पाणी कपातीबाबतचा फेर प्रस्ताव तयार केला आहे. गटनेत्यांच्या सुचनांनुसार तीन पर्याय प्रशासनाने समोर ठेवले आहेत. एक दिवस, एक दिवस आड पाणी, आठवड्यातून एकदा शटडाऊन अथवा शहराचे सात भागात वर्गीकरण करून प्रत्येक भागात एक दिवस पाणी कपात लागू करावी, असे तीन पर्याय महापालिका प्रशासनाने तयार केले आहेत. त्यामुळे दहा टक्के पाणी बचत होईल. तसेच पाटबंधारे खात्याने केलेल्या सुचनेनुसार पाणी उपसा करणे शक्‍य होईल, असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.

पवना धरणातील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल 11 टक्‍क्‍यांनी कमी झाला आहे. गतवर्षी आजमितीला धरणात 85 टक्‍के पाणी साठा होता. तर, यंदा 74 टक्‍के पाणी साठा शिल्लक आहे. उन्हाळ्यात तीव्र उन्हामुळे पाणी पातळी मोठ्या प्रमाणावर घटत असते. तसेच मागणी देखील वाढत असते. जुलैपर्यंत पाणी पुरवायचे असले तर पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे.
– प्रवीण लडकत, कार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा विभाग, महापालिका.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)