पिंपरी-चिंचवडकरांवर पाणी कपातीचे संकट

पिंपरी- गेली पंधरा दिवस परदेश, परराज्य दौऱ्यात असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे शहरातील पाणी कपातीचा निर्णय लांबणीवर पडला आहे. मात्र, हे सर्व पदाधिकारी व अधिकारी आता शहरात दाखल झाले असून, या आठवड्यात गटनेत्यांची बैठक आयोजित केली जाणार आहे. त्यामुळे लवकरच शहरातील पाणी कपातीचा निर्णय घेतला जाण्याची दाट शक्‍यता आहे.

पिंपरी-चिंचवड शहराला दररोज 440 एमएलडी पाणी उपसा करण्याची मंजुरी आहे. परतीचा पाऊस सरासरी न झाल्याने भविष्यात पाणी टंचाईला सामोरे जाऊ नये, याकरिता आतापासूनच खबरदारी घेण्याचे धोरण पाटबंधारे विभागाने अवलंबले आहे. पवना धरणातील पाणीसाठा जुलै 2019 पर्यंत पुरविण्यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी महापालिकेने दिवसाला 440 एमएलडी एवढाच मर्यादित पाणी उपसा करण्याची सूचना या विभागाने केली आहे. कालवा समितीच्या बैठकीत पवना धरणातील पाणी उपशाबाबत निर्णय झाला आहे. त्यामुळे पालिकेने पाण्याच्या काटसकरीने वापर करावा, असे पत्र जलसंपदा विभागाने महापालिकेला पाठविले आहे.

पिंपरी -चिंचवड शहराला मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. महापालिकेला पवना धरणातून वार्षिक 4.84 टीएमसी पाणी वापरास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. पवना धरणातून रावेत बंधाऱ्यापर्यंत पवना नदीची लांबी 40 किलो मीटर असून पाणी सोडल्यानंतर बंधाऱ्यापर्यंत पोहचण्यास तब्बल 14 तासाचा वेळ लागतो. पवना धरणातून महापालिका दररोज 480 ते 500 एमएलडी पाण्याचा उपसा करते. सद्य:स्थितीत महापालिका मंजुरीपेक्षा अधिक पाणी उचलत आहे.

पाणी उपसावर मर्यादा
रावेत बंधाऱ्यातील पाणी पातळी स्थिर ठेवण्यासाठी धरणातून अधिक विसर्ग केल्यामुळे जास्तीचे पाणी वाया जात आहे. परतीच्या पावसाचा फटका बसल्याने धरणातील पाणीसाठा कमी होत आहे. त्यामुळे धरणातील उर्वरित पाणीसाठा जुलै 2019 पर्यंत पुरविण्यासाठी पाण्याचा काटकसरीने करणे गरजेचे आहे. पवना धरणामध्ये पाणी साठा तुलनेने कमी आहे. त्यामुळे शहराचा पाणी वापर 440 एमएलडी मर्यादीत ठेवण्याबाबत नुकत्याच झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत निर्णय झाला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना जलसंपदा विभागाने महापालिकेला केली आहे. या पत्राचा संदर्भ देत, शहरात पाणी कपातीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र, महापालिकेचे पदाधिकारी परदेश दौऱ्यावर गेल्यानंतर हा निर्णय लांबणीवर पडला आहे. आता पाणी कपातीबाबत निर्णय घेणे गरजेचे आहे. यापूर्वीची गटनेत्यांची नियोजित बैठक पुढे ढकलावी लागली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)