पिंपरी-चिंचवडकरांची पाणी कपात वाढण्याची नामुष्की

– पवना धरणातील पाणी साठा 51 टक्‍क्‍यांवर
– 5 जूनपर्यंत पुरेल एवढाच साठा

पिंपरी – पाटबंधारे खात्याच्या सूचनेनंतरही महापालिकेने जास्तीचा पाणी उपसा सुरू ठेवल्याने पिंपरी-चिंचवडकरांना आता 10 टक्‍क्‍यांऐवजी 18 टक्‍के पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. पाणी कपातीचा निर्णय आणखी लांबल्यास कपात वाढवावी लागणार आहे. धरणातील पाणी पातळीत झपाट्‌याने घट होत असून पाणी साठा निम्म्यावर आला आहे. 5 जूनपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा आज उपलब्ध आहे. उन्हाळ्यात पाण्याची पातळी झपाट्याने घटते त्यामुळे मे महिनाअखेरीपर्यंत तरी पाणी पुरेल का, अशी भीती पाटबंधारे खात्याला सतावत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पिंपरी-चिंचवड महापालिकेने 440 एमएलडी पाणी उपसा करून पाणी काटकसरीने वापरण्याचा सूचना पाटबंधारे खात्याने केल्या आहेत. मात्र, पाणी कपातीबाबत सत्ताधाऱ्यांमध्ये एकमत होत नसल्याने महापालिकेकडून अद्यापही 500 एमएलडी पाणी उपसा सुरू आहे. दररोज 60 एमएलडी पाण्याचा जादा उपसा होत आहे. यंदा पावसाळ्याच्या अखेरीस पवना धरण क्षेत्रात अपेक्षेप्रमाणे परतीचा पाऊस झाला नाही. धरणात सध्या उपलब्ध असलेला पाणी साठा जुलैअखेरपर्यंत पुरविण्यासाठी पाणी वापराचे काटेकोरपणे नियोजन करावे, असे पत्र पाटबंधारे विभागाने पालिकेस नोव्हेंबर 2018 मध्ये पाठविले होते.

महापालिका दररोज सुमारे 500 एमएलडी पाणी रावेत बंधाऱ्यातून उपसा करते. हे पाणी शुद्ध करून संपूर्ण शहराला पाणी पुरवठा केला जातो. पाटबंधारे विभागाच्या पत्रानुसार पालिकेकडून तत्पर कार्यवाही अपेक्षित होती. पाणी कपातीची अंमलबजावणी करून पाणी बचतीची अंमलबजावणी केली जाऊ शकते. मात्र, याबाबत धोरण ठरविण्यात महापालिकेतील सत्ताधारी भाजपमध्ये एकमत होत नाही. त्यात विरोधकांच्याही विरोधाची भर पडली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पाणी कपातीचा निर्णय घेण्यास टाळाटाळ होत आहे. त्याची मोठी किंमत पिंपरी-चिंचवडकरांना मोजावी लागणार आहे.

पाणी पातळीत झपाट्‌याने घट
धरणात आजमितीला 51.53 टक्के पाणीसाठा असून गतवर्षी हा साठा 59.80 टक्के होता. गतवर्षीपेक्षा सरासरी 10 टक्के पाणी साठा कमी झाला आहे. हा पाणीसाठा 5 जूनपर्यंत पुरेल एवढाच आहे. पवना धरणातून दिवसाला 480 एमएलडीऐवजी 440 एमएलडीच पाणी उचलण्याचे सक्त आदेश पाटबंधारे विभागाने महापालिकेला दिले आहेत. मात्र, महापालिकेने हे आदेश फाट्यावर मारले आहेत. एकीकडे जास्तीचा पाणी उपसा सुरू असताना दुसरीकडे उन्हाळ्याला सुरूवात होत आहे. उष्णता वाढू लागल्याने पाणी पातळीत झपाट्‌याने घट होवू लागली आहे. त्यामुळे पाटबंधारे खात्याच्या चिंतेत भर पडली आहे.

चिंचवड, सांगवीचा पाणी पुरवठा विस्कळीत
चिंचवड गुरुत्व वाहिनीवर पवनानगर, चिंचवड येथे जलवाहिनी फुटली. ही पाणी गळती थांबविण्यासाठी महापालिकेकडून त्वरीत दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. त्यासाठी गुरूवारी रात्री साडेबाराच्या सुमारास पाणी पुरवठा बंद करण्यात आला. परिणामी दापोडी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, सांगवी, पिंपरी, भाटनगर, चिंचवड, प्रेमलोक पार्क, बिजलीनगर या भागाला शुक्रवारी (दि. 22) सकाळी विस्कळीत पाणी पुरवठ्याचा सामना करावा लागला. अचानकपणे घडलेल्या या प्रकारामुळे या भागातील नागरिकांना पाण्याअभावी गैरसोयीचा सामना करावा लागला.

गतवर्षीची तुलना करता पवना धरणात आजमितीला पाणी साठा दहा टक्‍क्‍याने कमी झाला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेला ऑक्‍टोबर 2018 मध्येच जलसंपदा मंत्री व पालकमंत्र्यांच्या बैठकीत पाणी वापर नियंत्रित करण्याबाबत आदेश देण्यात आले होते. त्यानुसार, 10 टक्के पाणी कपात लागू करणे अपेक्षित होते. मात्र, अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. धरणातील उपलब्ध पाणीसाठा पाहता महापालिकेला पाणी वापर आणखी नियंत्रित करावा लागेल. त्यानुसार, प्रस्तावित असलेली 10 टक्‍के पाणी कपात 17 ते 18 टक्‍क्‍यांपर्यंत वाढविणे अपेक्षित आहे. याबाबत महापालिकेला पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
– ए. एम. गदवाल, शाखा अधिकारी, पवना धरण.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)