पिंपरीत हॉकीपटूंना “अच्छे दिन’

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेने नेहरूनगर येथे उभारलेल्या मेजर ध्यानचंद हॉकी पॉलिग्रास स्टेडियमचा पुरेपुरे वापर व्हावा, यासाठी पालिकेने ऑलिम्पिकपटू विक्रम पिल्ले यांचे सहाय्य घेऊन पिंपरी-चिंचवड हॉकी ऍकॅडमीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. पिल्ले यांच्या प्रशिक्षणातून शहरातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय हॉकीपटू घडविण्याचे महापालिकेचे ध्येय आहे.

महापालिकेने हे स्टेडियम 1998 मध्ये उभारले आहे. गेल्या 20 वर्षांत त्याचा वापर योग्य पद्धतीने न झाल्याने स्टेडियम अक्षरश: धूळखात पडून आहे. पालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. मात्र, त्याची कामगिरी राज्यापर्यंतच मर्यादित आहे. या सुविधेचा वापर होऊन शहरात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय हॉकीपटू निर्माण व्हावेत म्हणून पालिका हॉकीपटू विक्रम पिल्ले यांचे सहाय्य घेत आहे. त्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड हॉकी ऍकॅडमीची स्थापन केली जाणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या संदर्भात पालिका व पिल्ले यांची हॉकी ऍकॅडमी 5 वर्षे कालावधीचा करार करणार आहे. ऍकॅडमीशी समन्वय साधून प्रशिक्षण कालावधी वगळून मैदान खासगी संस्था व संघटनेला स्पर्धेसाठी दिले जाणार आहे. त्यासाठी जमा होणारे शुल्क पालिका स्वत:कडे ठेवणार आहे. नवोदित स्थानिक खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा खेळ पाहता यावा, म्हणून दरवर्षी राज्य व राष्ट्रीयस्तर स्पर्धांचे आयोजन ऍकॅडमीतर्फे केले जाणार आहे. शालेय, महाविद्यालय आणि महापौर चषक स्पर्धेसाठी हे मैदान मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे.

पिल्ले यांचे मानधन, सहाय्यक प्रशिक्षक, मार्गदर्शक, सुरक्षा रक्षक, पॉलिग्रास मैदान व स्वच्छतागृहांची साफसफाई, किरकोळ खर्च आदींचा खर्चांसाठी पालिका दरमहा 2 लाख रूपये अदा करणार आहे. मैदानाचा वापर हॉकी खेळाचे प्रशिक्षण व सरावाच्या व्यतिरिक्त कोणत्याही कारणासाठी करता येणार नाही. करारनामा 5 वर्षे मुदतीचा असून, त्यासाठी 1 लाख रूपये अनामत रक्कम जमा करून घेतली जाणार आहे. ऍकॅडमी सुरू झाल्यानंतर दरवर्षीचा अहवाल पालिकेस सादर करणे बंधनकारक आहे. हा क्रीडा धोरणाचा प्रस्ताव आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या शिफारशीने मंजुरीसाठी पालिका सर्वसाधारण सभेत ऐनवेळी दाखल करून घेण्यात आला आहे. त्यावर 4 फेब्रुवारीच्या सभेत चर्चा होऊन मंजुरी दिली जाण्याची शक्‍यता आहे.

पालिकेच्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण
पालिकेच्या शाळेतील 14, 17 व 19 वर्षांखालील मुले व मुलींच्या प्रत्येकी 25 विद्यार्थी खेळाडूंना आणि दत्तक योजनेत मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यातून त्याचा संघ निवडला जाणार आहे. त्यांना हॉकी स्टिक, बॉल, शूज, स्पोर्टस किट महापालिका पुरविणार आहे. प्रशिक्षणाची वेळ दररोज सकाळी 7 ते 10 आणि दुपारी 4 ते सायंकाळी 6 अशी असणार आहे. ऍकॅडमीच्या वतीने पिल्ले स्वत: प्रशिक्षण देणार आहेत. ते अनुभवी सहाय्यक प्रशिक्षकाची नेमणूक करणार आहेत. तसेच, खासगी शाळा व महाविद्यालयाच्या खेळाडूंनाही प्रशिक्षण दिले जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)