पिंपरीत उबेर कार लंपास

पिंपरी – ग्राहकाने ट्रिपसाठी उबेर कार बुक केली. मात्र, ग्राहक आला नाही. त्यामुळे ती ट्रिप रद्द करून कारचालक निघाला. मोरवाडी येथे तोंड धुण्यासाठी थांबला असता त्याला चाकूचा धाक दाखवून त्याची कार पळवून नेली. ही कार उबेर या खासगी प्रवासी वाहतूक कंपनीला लावली होती. ही घटना रात्री अकराच्या सुमारास पिंपरी मधील मोरवाडी येथे घडली.

विठ्ठल मिरगाळे (वय 21, रा. वडगाव बुद्रुक, पुणे. मूळ रा. अक्कलकोट, जि. सोलापूर) या तरुणाने याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठल मूळचा सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथील आहे. मागील काही दिवसांपूर्वी तो कामासाठी पुण्यात आला. उबेर या खासगी प्रवासी वाहतूक कंपनीला कार (एम एच 14 / जी डी 4910) लावून तो चालकाचे काम करत होता. बुधवारी रात्री विठ्ठल प्रवाशांना सोडण्यासाठी मोरवाडी येथे आला.

साडेदहाच्या सुमारास त्याने मोरवाडी येथे प्रवाशांना सोडले. त्यानंतर त्याला महिंद्रा रॉयल रेसिडेन्सी येथील एक भाडे आले. तो तिथे गेला असता, प्रवासी आले नाहीत. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर प्रवासी न आल्याने त्याने ट्रिप रद्द केली. त्यानंतर तो मोरवाडी मधील तुकाराम मालुसरे रस्त्याने जात होता. तोंड धुण्यासाठी त्याने कार बाजूला घेतली. कार मधून खाली उतरून तोंड धूत असताना दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्याला चाकूचा धाक दाखवला. दोघांनी विठ्ठलकडील 2 हजार रुपये किमतीचा एक मोबाईल फोन, सहा लाख 50 हजार रुपये किमतीची स्विफ्ट डिझायर कार आणि महत्वाची कागदपत्रे असा ऐवज लंपास केला. यावरून गुन्हा नोंदविला असून पिंपरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पवन पाटील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)