पिंजरा लावूनही बिबट्या देतोय हुलकावणी

  • काठापूर बुद्रुक परिसरातील नागरिक भयभीत

लाखणगाव – आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील काठापूर बुद्रुक येथे बिबट्याला पकडण्यासाठी वनखात्याने पिंजरा लावून चार दिवस झाले. परंतु हुशार बिबट्या मात्र, पिंजऱ्याला हुलकावणी देत इतरत्र जात असल्याचे दिसून येते.
मागील आठ दिवसांपासून बिबट्याने 2 कुत्र्यांचा फडशा पाडला असून बिबट्याला घाबरुन दुचाकीस्वार पडल्याने एक शेतकरी जखमी झाला होता. त्यानंतर ग्रामस्थांनी वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली होती.ती मागणी मान्य करत वनविभागाने काठापूर बुद्रुक येथे पिंजरा लावला आहे. काठापूर बुद्रुक येथे वारंवार होणाऱ्या बिबट्याच्या दर्शनाने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.त्यामुळे लवकर बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद व्हावा, अशी ग्रामस्थांना आशा आहे. उसाची तोड सुरू झाल्याने बिबट्याचा निवारा कमी झाला असून बिबट्या मानवी वस्तीत येऊ लागला आहे. गावात रानडुकरांचा वावर असल्याने बिबट्याला शिकारीची कमतरता जाणवत नाही.त्यामुळे या भागात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर आहे. सध्या वन विभागाने येथे पिंजरा लावला असून यामध्ये बिबट्या अडकतो की गुंगारा देतो हे येत्या काही दिवसात पाहावयास मिळणार आहे. मागील तीन वर्षात काठापूर बुद्रुक येथून 3 बिबट्यांना वन विभागाने पकडले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)