पासपोर्ट कार्यालयात गर्दी ; एका आठवड्यात साडेचारशे अर्ज दाखल

सातारा, दि. 31 (प्रतिनिधी) – गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या पासपोर्ट कार्यालयाचा शुभारंभ दि.14 मे रोजी झाल्यानंतर एका आठवड्यात साडेचारशे अर्ज दाखल होत आहेत. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक दिवसाला सरासरी तीस अर्ज दाखल होत असून अर्जदारांनी निवडलेल्या वेळेप्रमाणे मुळ कागदपत्रांची व बायोमेट्रीक प्रणालीद्वारे अर्जदाराची सत्यता पडताळली जात आहे. दिवाळीच्या हंगामात परदेशी पर्यटनामुळे पारपत्राच्या मागणीमध्ये वीस टकके वाढ झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील पोस्ट ऑफीस कार्यालयात पासपोर्ट कार्यालय सुरू झाले आहे. पासपोर्ट व पोस्ट ऑफीस कार्यालयाचे प्रत्येकी दोन असे एकूण चार अधिकाऱ्यांची नियुक्ती कार्यालयात करण्यात आली आहे. साताऱ्यात कार्यालयात सुरू झाल्यामुळे जिल्हावासियांना आता पुण्याला जाण्याची पायपीट थांबण्यास मदत होत आहे. पासपोर्ट काढण्यासाठी अर्जदाराने प्रथम पासपोर्ट कार्यालयाच्या वेबसाईटवर ऑनलाईन पध्दतीने फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरताना कागदपत्रे व अर्जदाची सत्यता पडताळणीसाठी पासपोर्ट कार्यालयात येण्याची तारीख त्याच वेळी निवडायची आहे. निवडलेल्या तारखेदिवशी मुळ कागदपत्रे घेवून कार्यालयात आल्यानंतर त्या ठीकाणी अर्जदाराची पडताळणी प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. सध्या पडताळणी करण्यासाठी जिल्ह्यातून दररोज सरासरी तीस अर्जदार कार्यालयात येत आहेत. पडताळणी झाल्यानंतर रिपोर्ट पुणे येथील क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालयाला पाठविला जातो. त्यानंतर क्षेत्रीय कार्यालयातून अर्जदाराची चारित्र्य पडताळणी करण्यासाठी अर्जदारा रहिवास करित असलेल्या हद्दीतील पोलीस ठाण्यास पत्र पाठविले जाते. त्यानंतर पोलीस अर्जदारावर गुन्हे दाखल आहेत का, त्याबाबतची पडताळणी करतात व त्या प्रक्रियेनंतर अर्जदाराला पोलीस ठाण्यात दोन ओळखीचे लोक घेवून जावे लागते अथवा पोलीस ही अर्जदाराच्या घरी येवून पुर्ण पडताळणी करतात. पडताळणी पुर्ण झाल्यानंतर पोलीस रिपोर्ट पुणे येथील क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालयाला पाठवितात व त्यानंतर अर्जदाराला पासपोर्ट पोस्टाव्दारे पाठविण्यात येतो.

पासपोर्टसाठी दिड महिन्याचा कालावधी
पासपोर्टसाठी अर्ज पाठविण्यापासून ते सर्व प्रकिया पुर्ण होवून पासपोर्ट मिळण्यासाठी सध्या किमान दिड महिन्याचा कालावधी लागत आहे. या प्रक्रियेसाठी अर्ज भरताना दिड हजार रूपये इतके शुल्क ऑनलाईन अथवा चलनस्वरूपात भरणे आवश्‍यक आहे. तर तात्काळ पासपोर्ट प्राप्त करण्यासाठी साडेतीन हजार रूपये शुल्क भरल्यास अधिक गतीने पासपोर्ट प्राप्त होतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बारामतीप्रमाणे पाटणमध्ये कार्यालयाची गरज
पासपोर्ट कार्यालयाने नुकतेच पुणे जिल्ह्यात बारामती तर सोलापुर जिल्ह्यात माढा येथे अतिरिक्त कार्यालयांना मंजुरी दिली आहे. त्या धर्तीवर सातारा जिल्ह्यातील दुर्गम तालुक्‍यांमध्ये महाबळेश्वर, पाटण व दहिवडी येथे पासपोर्ट कार्यालय सुरू करण्याची मागणी आता पुढे येवू लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)