पावसाळ्यात देहूकरांचे तोंडचे पाणी पळाले

  • ग्रामस्थ हवालदिल : “एमजीपी’कडून ग्रामपंचायतीला इशारा
  • पुन्हा एकदा आमदार बाळा भेगडे यांच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष

देहुरोड – महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची नळपाणी पुरवठा योजना ग्रामपंचायतीने तातडीने ताब्यात घ्यावी अन्यथा पाणी पुरवठा बंद करण्यात येईल, असा पुन्हा एकदा इशारा पत्रव्यवहार करून ग्रामपंचायतीला दिला आहे. या पत्रानुसार ग्रामस्थांमध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न उद्‌भवल्यास जीवन प्राधिकरण त्याला जबाबदार असणार नाही, ग्रामपंचायतीने प्रशिक्षणासाठी आपले कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, असे लेखी पत्र 27 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायतीला दिले आहे. त्यामुळे गेली दोन दिवस देहूचा पाणी पुरवठा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून बंद ठेवण्यात आला आहे, असे असतानाही ग्रामपंचातीची कोणतीही ठोस भूमिका नसल्याने देहूकरांचे ऐन पावसाळ्यात तोंडचे पाणी पळाले आहे.

“एमजीपी’ने देहुकरांचे पाणी बंद केल्यामुळे आता पुन्हा एकदा आमदार संजय भेगडे यांनी मध्यस्थी करून ही योजना कार्यन्वित ठेवावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. अन्यथा पिंपरी चिंचवडला बोडकेवाडीतील बंधाऱ्यातून पाणी उचलू द्यावे व देहूलाही पालिकेच्या दराने नियमित व मुबलक शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, असा सूरही नागरिकांमध्ये आहे.
देहूगावला गेल्या 50 वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून नळपाणी पुरवठा करीत आहे. मात्र विविध कारणांनी येथील नळजोड ग्राहकांनी पाणीबील न भरल्यामुळे आणि थकबाकी वसुलीसाठी थकबाकी हवी, त्या प्रमाणात होत नसल्याने सुमारे एक कोटी रुपयांची थकबाकी थकली आहे. गावात सध्या तीन हजार नळजोड धारकापैकी निम्मे म्हणजे सुमारे 1500 नळजोड धारक देहूकरांकडे सुमारे साडेतीन कोटी रुपयांची थकबाकी असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने हे पाऊल उचलले असल्याचे शाखा अभियंता धनंजय जगधने यांनी सांगितले.

देहूगाव हे तीर्थक्षेत्र असल्याने वेळोवेळी लोकसंख्येच्या प्रमाणात पाणी पुरवठा योजनेचे विस्तारीकरण करण्यात आले होते. सध्याही पाणी पुरवठ्या योजनेचे विस्तारीकरण करण्यात आले आहे, असे असताना याबाबत मंत्री स्तरावर आमदार संजय उर्फ बाळा भेगडे यांच्या मध्यस्थीने येथील पाणी पुरवठा योजना चालू ठेवण्याबाबत चर्चा झाली होती. ही योजन ग्रामपंचायत चालविण्यास सक्षम नसल्याचे कारण देत ही योजना ग्रामपंचायत ताब्यात घेत नाही. मात्र जीवन प्राधिकरण याचे प्रमुख कारण, येथील ग्रामस्थ पाणीबील भरत नाहीत असेही त्यांनी सांगितले.

काही ठिकाणी पाणी नाही, तर काही ठिकाणी अपुरा पाणीपुरवठा होत असल्या कारणांनी ही थकबाकी वाढत जाऊन शिल्लक राहिलेली आहे. नवी योजना सुरु करण्यापूर्वी थकबाकी वसूल करणे हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पुढे मोठे आव्हान आहे. त्यांनी या वसुलीला नळजोड बंद करून पाणीबील वसुलीला सुरू केले आहे. ऐन पावसाळ्यात नळजोड बंद केल्याने ऐन पावसाळ्यात देहूकरांनी पाणी मिळेन नसल्याचे दिसून येत आहे.

देहूच्या पाणी प्रश्‍नाबाबत आमदार संजय भेगडे यांनी जलसंपदा मंत्री व जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांसमवेत चर्चेतून मार्गकाढून ही योजन चालविण्याबाबत निर्णय झाला होता. मात्र पालखी सोहळ्यानंतर या प्रश्‍नावर चर्चा न झाल्याने 27 ऑगस्ट रोजी जीवन प्राधिकरणने 1 सप्टेंबरपासून देहूचा पाणी पुरवठा बंद केला आहे. याप्रश्‍नामध्ये आमदारांनी तातडीने लक्ष घालावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

आधी समस्येचे निराकरण करा…
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणी पुरवठ्याच्या बाबतच्या तक्रारी सोडविण्यात बऱ्याच वेळा अपयश आल्याचे लक्षात आले आहे. येथील ग्रामस्थांनी आम्हाला शुद्ध व स्वच्छ पाणी पुरवठा करा, माळीनगर व देहूगाव येथे दोन वेळा पाणी पुरवठा केला जातो, तर देहू व विठ्ठलनगरला एकच वेळ पाणी पुरवठा केला जात आहे. हा पाणी पुरवठा दोन वेळा केला पाहिजे. माळीनगर मधील हनुमान मंदिर परिसरात व विठ्ठलनगर मधील काही नळांना गेली काही वर्षे पाणीच येत नव्हते तरीही पाणीबील येतच होते. येथील ग्राहकांनी पाणी येत नसल्याचे अर्जही दिले होते. मात्र यावर कोणताही तोडगा काढला गेला नसल्याने ही बिले थकली आहे. समस्येचे नेमके निराकरण करा व ही थकीत बिले वसूल करा, असे वेळोवेळी ग्रामस्थांनी मागणी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)