पावसाळी आपत्तींचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज

जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून उपाययोजना : संबंधीत डॉक्‍टरांना सूचना

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि.13 – पावसाळ्यामध्ये साथीचे आजार वाढतात, पुरस्थिती आणि अन्य आपत्ती उद्‌भवतात. त्यावर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून उपाययोजना करण्यात आली आहे. त्याबाबत संबंधीत डॉक्‍टरांना सूचना देण्यात आल्या असून, विशेष यंत्रणाही उभी केल्याची माहिती आरोग्य व बांधकाम सभापती प्रविण माने यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जिल्ह्यात 96 प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. पावसाळ्यामध्ये कोणती आपत्ती कधी येईल हे सांगू शकत नाही. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकिय अधिकारी आणि सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना मुख्यालयात राहण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. जोखीमग्रस्त नदीकाठच्या भागातील कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याबाबतही आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्‍यता आहे, अशा गावांमध्ये दैनंदिन सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. तसेच साथीच्या आजारांवर वेळीच उपाययोजना करण्यासाठी गावातील घरांना भेटी देऊन जलजन्य व किटकजन्य आजाराचा शोध घेण्यात येणार आहे. साथरोगाविषयी प्रतिबंधात्मक व नियंत्रणात्मक उपचार करण्यात येत असून, आरोग्य शिक्षणही देण्यात येत आहे. जलजन्य आजाराच्या प्रतिबंधासाठी कार्यक्षेत्रातील पाणी स्त्रोतांची तपासणी करण्यात येवून पाणी नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.

एप्रिल आणि मे महिन्यात स्वच्छता सर्वेक्षण करण्यात आले आहे. पाणी स्त्रोतांमधील नळगळती व स्वच्छता करण्यात येत आहे. पाणी शुध्दीकरणासाठी जलसुरक्षकांचे प्रशिक्षण घेण्यात आले असून, जिल्ह्यात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत साथरोग सर्व्हेक्षण अधिकारी यांची नोडल ऑफिसर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. विविध विभागातील कर्मचारी व परिचर यांची नियंत्रण कक्षात नेमणूक करण्यात आली आहे. तसेच किटकजन्य आजारांच्या नियंत्रणासाठी प्रत्येक गावात दर आठवड्याला सर्वेक्षण करण्यात येणार आहे. जोखीमग्रस्त भागात किटकनाशक, फवारणी करण्यात येते. डासांच्या नियंत्रणासाठी गप्पीमाशांचा वापर, मच्छरदाण्या, डासप्रतिरोधक क्रिम, खिडक्‍यांना जाळ्या बसविणे आदींबाबत आरोग्य शिक्षण देण्यात येत आहे.

……………….
जिल्ह्यातील 96 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये 24 तास साथरोग नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. याबाबत आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क ठेवून आहे. जिल्हा स्तरावर त्वरीत प्रतिसाद पथकामार्फत साथीच्या उद्रेकाच्या ठिकाणी 24 तासाच्या आत भेट देवून उपाययोजना करण्यात येत आहे
प्रविण माने – आरोग्य व बांधकाम सभापती, जिल्हा परिषद

……………….

13 तालुक्‍यातील 84 गावे बाधिक
पावसाळ्यात पुरनियंत्रण आणि आपत्तकालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून 24 तास नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 13 तालुक्‍यात मिळून 84 बाधिक गावे असून, 5 गावांमध्ये पुराचा संभाव्य धोका असतो. त्यामध्ये भोर तालुक्‍यातील पऱ्हाटी, लुमेवाडी, निरा, बारामती तसेच मुळशी, वेल्हा, हवेली आणि पुणे शहर या भागांतील हिंगणे खुर्द, शिवाजीनगर, येरवडा, संगमवाडी, लोणीकाळभोर, चांदे, वाकड, औंध, हिंगणगाव, पिंपरी-चिंचवड, रहाटणी, कासारवाडी, फुगेवाडी, खेड येथील राजगुरूनगर, आळंदी, सांगुर्डी, आंबेगाव, शिरूर येथील चांडोली, चिंचोली, जावळे, बाभुळसर, जुन्नरमधील सावरगाव, नारायणगाव, शिरूर, हवेली आणि दौंड येथील पिंपरी सांडस, वढू खुर्द, डोंगरगाव, पेरण, आष्टापूर, काशिंबे, खोरवडी, भांडगाव, मावळ येथील कामशेत, भावडी, फुलगा यांचा समावेश आहे; तर पुराचा संभाव्य धोका हा खेड तालुक्‍यातील सांगुर्डी, दौंड तालुक्‍यातील हातवळण, हिंगणेबेरडी, शिरापूर आणि इंदापूर येथील निरा नरसिंगपूर या गावांना आहे.

आपतकालीन परिस्थिती उद्‌भवल्यास नियंत्रण कक्षास त्वरीत संपर्क साधावा : 020-26129965 (जिल्हा परिषद आरोग्य विभाग)

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)