पावसाने शेकडो घरांची पडझड, खरीप पिके पाण्याखाली

नगर -जिल्ह्यात गत आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसाने शेकडो घरांची पडझड झाली आहे. पुरात वाहून गेल्या तसेच घराची भिंत पडल्याने वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाने तत्काळ मदत पोहोचविली असून आपत्कालीन विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

जिल्ह्यात सर्वदूर पाऊस सुरू आहे. उत्तर नगर जिल्ह्यात झालेल्या तुफान पावसानंतर आता दक्षिणेतदेखील मूसळधार पावसाने दाणादाण उडविली आहे. कर्जत, श्रीगोंदे, पारनेर, जामखेड तालुक्‍यात मंगळवारी (दि.29) जोरदार पावसाने हजेरी लावली. नगर तालुक्‍यातही दमदार पावसाने हजेरी लावली आहे. मूग, उडिद तसेच इतर काढणीला आलेली पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

पावसाने पुरात वाहून गेल्याने अक्षय अशोक गवळी (वय 22 मारोतीनगर, नेवासे) व आशा मारूती बांबेरे (वय 28, कोदणी, अकोले) यांचा तसेच तसेच गोपाळ लक्ष्मण देशमुख (वय 65, ढोरजळगाव, शेवगाव) यांचा भिंत अंगावर पडल्याने मृत्यू झाला. प्रशासनाने या कुटुंबीयांना तत्काळ मदत पोहोचविली आहे.

पडझड झालेल्या कच्चा तसेच पक्‍क्‍या घरांची संख्या 215 वर जाऊन पोहोचली आहे. याशिवाय 511 घरांची अंशतः पडझड झाली असून प्रशासनाने अनुक्रमे 1 लाख 40 हजार तसेच 4 लाख 22 हजार रुपये मदत दिली आहे.जिल्ह्यात खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेषतः कपाशीचे नुकसान अधिक आहे. पिके पाण्याखाली गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. या पावसाने विहिरी तसेच बोअरवेलची पाणी पातळी वाढल्याने रब्बीचा हंगाम चांगला होणार असल्याने आनंदाचे वातावरण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)