पावसाच्या अचूक अंदाजावर पुन्हा प्रश्‍नचिन्ह

– समीर कोडिलकर

पुणे – मान्सूनचा हा अनियमितपणा दरवर्षीच शेतकऱ्यांना संकटात टाकत असतो. पाऊस तर लहरी आहेच, पण या पावसावर सतत अभ्यास करणारे हवामान खाते तर लहरी नाही ना, त्यांनी पावसाचा अचूक अंदाज द्यायला हवा होता. हा दिला असता शेतकऱ्यांना पिके वाचविण्याची थोडी संधी मिळाली असती, पण मान्सूनच्या लहरीपणावर हवामान खात्याने तरंगणे योग्य वाटत नाही.

राज्यात जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने उघडीप घेतली, ती ऑगस्टच्या पहिल्या पंधरावड्यापर्यत कायम होती. 13 ऑगस्टपासून पुनरागमन करणाऱ्या पावसाने आता विदर्भ, मराठवाडा चिंब केला आहे. पावसाचा जोर इतका होता, की नदी-नाल्यांना पूर आले. पावसाने दडी मारल्याने पिके वाळण्याची भीती निर्माण झाली होती. त्याचवेळी पावसाचे आगमन झाले, पण त्याचाही जोर इतका होता की पिके वाहून गेली.

आज राज्यात विदर्भ आणि मराठवाडयात पावसाचा जोर अधिक आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही चांगला पाऊस पडत आहे. उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे नदी-नाल्यांकाठच्या बहुतांश शेतातील पिके पुराने खरडून नेली. तर काही ठिकाणी पिकावर गाळ बसून ती वाया गेली. हजारो हेक्‍टरवरील खरीप पिकांचे नुकसान तर झालेच, मात्र जीवित-वित्तहानीही मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

राज्यात यंदा 95 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज पहिल्या टप्यात दिला होता. त्यानंतर दुसऱ्या टप्यात ऑगस्टमध्ये जास्त पाऊस पडेल, असे म्हटले होते. ऑगस्टमध्ये पावसाला सुरूवात झाली खरी, पण त्याचा जोर इतका असेल, हे मात्र स्पष्ट झाले नव्हते. राज्याचा अंदाज देताना साधारणत: तो मध्य महाराष्ट्र, कोकण-गोवा, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र अशा स्वरुपात दिला जातो. हा अंदाज काय उपयोगाचा, उलट अंदाज देताना थेट जिल्हा किंवा तालुक्‍याचा दिला पाहिजे. म्हणजे तो शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरू शकतो.

अतिवृष्टी, पूर, गारपीट अशा आपत्तींमध्ये ड्रोन कॅमेरे, सॅटेलाईट मॅपिंग अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर झाल्यास नुकसानीची तत्काळ आणि अचूक माहिती मिळू शकते. शासनाला हे करणे कठीण नाही. परंतू याबाबत शासन-प्रशासनाकडून अनेक वेळा केवळ चर्चा होत असून, यांचा प्रत्यक्ष अवलंब अजूनही होताना दिसत नाही. राज्यात दोन-तीन दिवस झालेल्या अतिवृष्टीने हवामान विभागाच्या अचूक अंदाजावर पुन्हा एकदा प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे. राज्यात ठराविक विभागात धुवॉंधार पावसाचा इशारा वर्तविण्यात आला असता, हा इशारा प्रशासनामार्फत संबंधित गावांत पोचविण्यात आला असता तर पूर्णपणे जीवितहानी; तर काही प्रमाणात वित्तहानी टळली असती, हे हवामान विभागासह शासन-प्रशासनाने लक्षात घ्यायला हवे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)