पावसाची हुल; भीषण दुष्काळाची चाहुल

– समीर कोडिलकर

पुणे – सप्टेंबर-ऑक्‍टोबरदरम्यानचा कालावधी हा शेतीसाठी संक्रमणाचा काळ मानला जातो. खरीप हंगाम संपत आलेला असतो आणि रब्बीच्या तयारीला नुकतीच सुरूवात होते. पण यंदा हे चक्र उलटे फिरण्याची भीती आहे. त्याला कारणीभूत ठरला आहे, तो मान्सून. यंदा पावसाने जी काही असमानता दाखविली, तीच आगामी काळातील दुष्काळाची चाहुल देणारी ठरली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बळीराजा संकटांना तोंड देत आहे.

-Ads-

खरिपातील पिकांची काढणी, मळणी आणि विक्रीची कामे ऑक्‍टोबरदरम्यान सुरू असतात. तर रब्बीसाठी मशागत, पेरणी या कामांसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू असते. पण, यंदा मात्र हे सगळेच ठप्प झाले आहे. यंदा पाऊस बरसलाच नाही. जून कोरडा गेला. त्यानंतर जुलैमध्ये महिनाभर पाऊस चांगला झाला. ऑगस्टच्या पहिल्या टप्यात चांगला पाऊस झाला. या दीड महिन्यात जो काही पाऊस झाला, त्यातून काही प्रमाणात धरणे भरली. पण, पिकांचे काय? असा प्रश्‍न पडला आहे. कारण, ऑगस्टनंतर पावसाने जी दडी मारली ती शेवटपर्यत कायम राहिली.परतीच्या मान्सूनच्या काळात अनेकवेळा पाऊस दिलासा देऊन जातो. गेल्या वर्षी परतीच्या मान्सूनने मराठवाडा व पश्‍चिम महाराष्ट्रातील काही भाग हिरवागार केला. पण, यंदा मान्सून राज्याबाहेर कधी गेला हे काही कळलचे नाही. धरणे भरली असली, तरी उपसा मात्र लगेच सुरू झाल्याने आता ती लवकरच कोरडी पडणार हे निश्‍चित आहे. राज्यातील दोनशेहून अधिक तालुक्‍यांत 50 टक्‍क्‍यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्याचा फटका शेतीला बसणार आहे.

खरिपाचे पीक चांगले आले, की पुढील वर्षभराचे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित व्यवस्थित बसते. पावसाने जी उघडीप दिली, त्यामुळे पिके करपू लागली आहे. त्यातच कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. गेल्या वर्षीची उसाची विक्रमी आकडेवारी पाहता यंदा त्यापेक्षा जास्त उत्पादन होईल, असे वाटत होते. मराठवाडा आणि विदर्भात तर पिके करपली आहेत. पिण्यासाठीच पाणी नाही, तर शेतीला कुठून देणार? अशी स्थिती आहे. त्यामुळे आता राज्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी होत आहे.

अलिकडे हवामानाचे अल्पकालीन अंदाज बऱ्यापैकी खरे ठरत असताना दीर्घकालीन अंदाजात मात्र अजूनही अचूकता साधण्यात अपयशच आले आहे. अपुऱ्या आणि अनियमित पावसाने राज्यातील बहुतांश भागांतील भू जलपातळी खालीच आहे. सध्या “ऑक्‍टोबर हिट’मुळे वाढते तापमान आणि पुढील उन्हाळ्यासह एकूण नऊ महिन्यांच्या कालावधीत उद्योग, शेती आणि पिण्यासाठीसुद्धा पाण्याची मागणी वाढतच जाणार आहे. अशा वेळी शासन, प्रशासनाने पाण्याचे योग्य नियोजन केल्यास पुढे दुष्काळाचे फारसे चटके बसणार नाहीत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)