पावसाअभावी उभ्या पिकांत अौत….

भोयरे गांगर्डा (ता.पारनेर) येथील शेतकऱ्यांनी खरिप हंगामातील मुग पिकाला पावसाअभावी पाळी घातली. (छाया - शरद रसाळ, सुपा)

भोयरे गांगर्डा परिसरात उभ्या पिकांना घातल्या पाळ्या

सुपा – गेल्या दीड महिन्यांपासून पावसाने ओढ दिल्यामुळे पारनेर तालुक्‍यातील भोयरे गांगर्डा, कडूस गावातील खरीपाची पिके वाया गेली असून पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

-Ads-

तालुक्‍यातील सुपा परिसरात वाळवणे, रुईछत्रपती, रायतळे, अस्तगाव, पिंपरी गवळी, रांजणगाव मशिदी, वाघुंडे, म्हसणे, हंगा, मुंगशी, जातेगाव आदी गावांमध्ये जून महिन्याच्या अखेरीस झालेल्या जेमतेम पावसावर शेतकऱ्यांनी मुग, बाजरी, मका, तूर व कांद्याच्या बीयाची पेरणी मोठ्या प्रमाणात केली. मात्र या जिरायती भागात एक महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने संपूर्ण खरिप हंगाम अडचणीत आला आहे.पिकांची वाढ खूंटली असून कोरडवाहू पिकांनी अक्षरशः माना टाकल्या आहेत. विशेष म्हणजे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. विहिरी व कुपनलिकांची पाण्याची पातळी अजून वाढलेली नाही. खरिप पिके सुकू लागल्याने त्यांना पाणी द्यायचे कुठून असा प्रश्‍न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. गवत ही सूकून गेले असल्याने व मका, घास आदि पिके नष्ट होऊ लागल्याने शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावणारा दुग्ध व्यवसाय देखील संकटात सापडला आहे.

भोयरे गांगर्डा येथील शेतकऱ्यांनी उभ्या पिकांना पाळ्या घातल्या आहेत तर कडूसमध्ये पाऊसच न झाल्याने जमिनी अक्षरशः मोकळी आहेत. गेल्यावर्षी प्रमाणे याही वर्षी चांगला पाऊस होईल, या आशेवर शेतकऱ्यांनी उसनवारी करून बियाणे खरेदी केले व अल्पशा पावसावर पेरण्या केल्या. मात्र पेरलेले बियाणे वाया गेल्याने खरीप हंगामातील कमी कष्टात भरघोस उत्पन्न देणारे मुग पिकच गेल्याने शेतकऱ्यांची आर्थिक घडी कोलमडली आहे. गेल्या वर्षी चांगल्या प्रकारे पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी कांदा हे पिक मोठ्या प्रमाणात घेतले. साठवलेला कांदा मातीमोल भावाने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. कांदा उत्पादनाचा खर्चही निघून येत नसल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. तर मुग हे नगदी पिक हातचे गेल्याने शेतकरी वर्ग विवंचणेत आहे.

पिकाचे पंचनामे करुन नुकसान भरपाईची मागणी

खरिप हंगाम तर गेलाच परंतू अशीच परिस्थिती राहिली तर पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या भेडसावणार असून रब्बी हंगामाच्या पेरण्या होतील कि नाही. यासाठी शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतिक्षेत आहे. या संकटातून दिलासा देण्यासाठी शासनाने खरीप पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी केली आहे.

जलयुक्‍तच्या कामांना पावसाची प्रतिक्षा!

पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब जमिनीतच जिरावा. यासाठी शासनाच्या वतीने सुपा परिसरात वाळवणे, रुईछत्रपती, वाघुंडे, पळवे, कडूस, बाबुर्डी, भोयरे गांगर्डा आदी गावात जलयुक्‍तच्या माध्यमातून शेतात समतलचर, बांध यासह कोल्हापूर पद्धतीचे बंधारे दुरुस्ती, नाले दुरूस्तीचे कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. मात्र चालू वर्षी सर्वच नक्षत्र कोरडे जावू लागल्याने या कामांना मोठ्या पावसाची प्रतिक्षा आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)