पिंपरी – मोबाईल हिसकावणाऱ्या दोन सराईतांसह एक अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून तब्बल पावणे सहा लाखांचे 67 मोबाईल फोन जप्त केले आहेत. ही कारवाई गुन्हे शाखा युनीट एकच्या पोलीस पथकाने केली.
अमिन सज्जाद इनामदार (वय-25, रा. आदर्शनगर, मोशी), शेखर संभाजी जाधव (वय-19, रा. दिघी रोड, भोसरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून एका 16 वर्षाच्या अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले आहे.
सहायक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोबाईल चोरीसंदर्भात तपास करीत असताना पोलीस शिपाई गणेश सावंत यांना खबर मिळाली की, अमिन व शेखर हे नाशिकफाटा येथे चोरीचे मोबाईल विक्रीसाठी आले आहेत. त्यानुसार सापळा रचून त्यांना पोलिसांनी अटक केली. अमिन याच्याकडून 13 मोबाईल जप्त करण्यात आले. त्याचे मोबाईल चोरीचे दोन गुन्हे उघड झाले आहेत. तर आरोपी शेखर याच्याकडून 41 मोबाईल जप्त केले व त्याच्यावरील भोसरी पोलीस ठाणे येथील गुन्हा उघडकीस आला आहे. या दोघांकडे अधिक तपास केला असता त्यांनी भोसरी येथील भगतवस्तीमध्ये अल्पवयीन मुलाकडे आणखी मोबाईल असल्याचे सांगितले. यावेळी पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेत त्याच्याकडूनही 13 मोबाईल जप्त केले. विवो, सॅमसंग, एम. आय. अशा कंपनीचे तब्बल 5 लाख 85 हजार रुपयांचे हे मोबाईल आहेत.
घरातून चोरीला गेलेल्या फोनचे प्रमाण जास्त
तपासामध्ये असे उघड झाले आहे की, आरोपी शेखर याने खिडकीतून व घराच्या उघड्या दरवाज्याद्वारे फोन चोरले आहेत. बऱ्याचवेळा रेंजसाठी किंवा चार्जिंगसाठी नागरिक त्यांचे फोन खिडकी जवळ अथवा दरवाजाजवळ ठेवतात. मात्र घरात कोणाचे लक्ष नसताना आरोपी हा थेट घरातून फोन चोरत होता. ज्यांचे फोन चोरीला गेले आहेत. त्या नागरिकांनी गुन्हे शाखा युनिट एकचे सहायक पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील यांच्याकडे 9702999467 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. मोबाईल तसेच किंमती ऐवजाबाबत दक्षता घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.