पाळीव प्राणी ठरताहेत अडचण

विकास वाळुंजकर

नागरीकरणाच्या ज्या नव्या समस्या आहेत त्यापैकी पाळीव प्राणी हा विषय आता पुढे येत आहे. सहकार कायद्यात याबाबत नेमकी तरतूद नसल्याने उपद्रवकारक पाळीव प्राण्यांच्या तक्रारींचे काय हा विषय आता ऐरणीवर आला आहे. उपद्रवमूल्य या अंगाने हा विषय समस्येचा असला तरी त्याला माणुसकी, भूतदया, व्यक्‍तिस्वातंत्र्य, पशूपक्षी या विषयी असलेली ओढ, पर्यावरणीय बांधिलकी असे अनेक पैलू आहेत.

सदनिकेत कोंडून ठेवलेल्या एका सोसायटीतील तब्बल अठ्ठेचाळीस मांजरांचा छळ न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे काही दिवसांपूर्वी थांबला. या मांजरांचा अनेक महिने छळ चालू होता. हौस म्हणून ही मांजरं पाळली होती. सकस अन्न मिळत नसल्याने ही मांजरं अशक्‍त झाली होती. मांजरांचे आजार, अस्वच्छ राहणीमान व आरडाओरडा यामुळे या सोसायटीतील बिऱ्हाडे वैतागली होती. सहन न होणारी स्थिती असल्याने काही रहिवासी आजारी पडत होते. पाळीव प्राण्यांबाबत सोसायटी कायद्यात निश्‍चित स्वरूपाची तरतूद नसल्याने या प्रकाराने संपूर्ण सोसायटी हादरली होती.

कॅंन्टोन्मेट कोर्टाने नुकतीच या मांजरांची सुटका केली व प्राणी दत्तक योजनेतून त्यांना चांगल्या घरी पाठवायला परवानगी दिली. एका माध्यमाने मांजरांची ही कहाणी वाचकांसमोर आणली. गेल्या वर्षी सप्टेबर महिन्यात हा प्रकार उघडकीस आला होता. ऍनिमल वेलफेअर बोर्डाने पोलिसांच्या व काही स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने हस्तक्षेप करून ही मांजरे ताब्यात घेतली होती. त्यावेळी काही मांजरे आजारी, अशक्‍त तर काही प्रेग्नंट असल्याचे आढळले. काही मांजरांना धड चालताही येत नव्हते. पोलिसांकडे तक्रार दाखल झाल्यावर पशूंच्या रुग्णवाहिकेतून ही मांजरे बावधन येथील पशू आधार केंद्रात नेण्यात आली.

यातील बरीचशी मांजरे दोन ते सात वयोगटातील आहेत. आजारपण आणि मानसिक धक्‍क्‍याने ती बिथरली होती. पाळीवपणाचे प्रेम न मिळाल्याने यापैकी सात मांजरे दगावली. या मांजरांवर उपचार करण्यासाठी मोठा खर्च झाला. त्याची भरपाई मिळावी म्हणून आता मालक व स्वयंसेवी संस्था यांच्यात वाद चालू आहे. संपूर्ण सोसायटी या समस्येने हादरली आहे. या निमित्ताने सोसायट्यातील पाळीव प्राण्यांचा प्रश्‍न हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.

पाळीव प्राण्यांच्या अशा अनेक तक्रारी सध्या पोलिसांकडे व सहकार खात्याकडे येत आहेत. त्यामध्ये मांजरांबरोबरच कुत्री व कबुतरे यांच्या उपद्रवाच्या तक्रारींचा समावेश आहे. न पाळलेली भटकी मांजरे सोसायटीच्या आवारात रात्री अपरात्री भटकतात. उंदीर, कबुतरं यांची शिकार करून त्याचे अवशेष सोसायटीतच टाकून पसार होतात. त्याची दुर्गंधी सोसायटीत पसरते. काही मांजरं पार्किंगमधील दुचाकीची आसने कुरतडून टाकतात. पाळलेली कुत्री रात्री अपरात्री भुंकून सदनिकाधारकांची झोपमोड करतात. पोपट पाळणारे गाळेधारक आठ दहा पोपट पाळतात. त्यांच्या केकाटण्याने लोक हैराण होतात.

ढोबळमानाने अशा स्वरूपाच्या या तक्रारी आहेत. नागरीकरणाच्या ज्या नव्या समस्या आहेत त्यापैकी पाळीव प्राणी हा विषय आता पुढे येत आहे. सहकार कायद्यात याबाबत नेमकी तरतूद नसल्याने उपद्रवकारक पाळीव प्राण्यांच्या तक्रारींचे काय हा विषय आता ऐरणीवर आला आहे. उपद्रवमूल्य या अंगाने हा विषय समस्येचा असला तरी त्याला माणुसकी, भूतदया, व्यक्‍तिस्वातंत्र्य, पशूपक्षी या विषयी असलेली ओढ, पर्यावरणीय बांधिलकी असे अनेक पैलू आहेत. मित्र, भागीदार म्हणूनही पाळीव प्राण्यांकडे पाहिले जाते. हे प्राणी माणसावर उपकार करीत असतात त्यांच्यापासून भावनिक सुरक्षा मिळते.

आज्ञाधारक असलेले काही प्राणी लळा लावतात. काही प्राणी उंदीर, झुरळे, घुशी यापासून रक्षण करतात. कुत्रा धन्यावर प्रेम करतो. इमान राखतो. त्याच्या सहवासाने कुटुंबाला दिलासा मिळतो. असे मुद्दे प्राण्यांवर प्रेम करणारे मांडतात. एकूणच सोसायट्यांमध्ये कुत्रा, मांजर, पोपट, मैना, पॅंराकिट, लव्हबर्डस, कबुतरे, साळुंकी, तितर, ससाणा, बुलबुल, पारवा असे प्राणी, पक्षी पाळले जातात. अशी माहिती पुढे आली आहे. त्यात आता मासे, ससे, अस्वले, साप, माकडे याची भर पडत असल्याने सोसायट्यांच्या पातळीवर आता नव्या समस्या पुढे येऊ लागल्या आहेत. गाय, बैल, कोंबड्या, डुकरं, उंट हे प्राणी पाळीव असले तरी अजून ते सोसायट्यात आलेले नाहीत. परंतु जे प्राणी सोसायट्यात राहतात ते सार्वजनिक आरोग्याचे काही गंभीर प्रश्‍न निर्माण करीत आहेत. ही बाब सोसायट्यांना डोकेदुखीची ठरत आहे. सोसायट्यांच्या व्यवस्थापनाला सध्या तरी त्यावर उत्तर सापडत नाही.

जनुकीय विविधता कमी झाल्याने या प्राण्यांना अनेक प्रकारचे आजार जडलेले असतात. त्यापासून माणसाला पॉंक्‍सचे विषाणू, क्षयरोग, गोवर, दमा यासारखे आजार जडतात. अशी माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे. पिसाळलेली कुत्री व मांजरं यापासून अलर्क नावाचा घातक रोग जडतो. लेप्टोस्पायरोसिसचा प्रसार कुत्र्याच्या मूत्रातून होतो. अशी कितीतरी माहिती उपलब्ध आहे. याबाबत कायद्यात स्पष्टता नसल्याने पाळीव प्राणी हा विषय गृहनिर्माण संस्थांना अडचणींचा ठरला आहे. सहकार खात्याने या विषयाचे गांभीर्य ओळखून पाळीव प्राण्यांबाबत नियमावली तयार करण्याचे अधिकार सोसायट्यांना दिले तरच यातून मार्ग निघेल असे वाटते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)