पालिकेसाठी पोलीस आयुक्तालयात “सिंगल विंडो’

संयुक्त बैठकीत निर्णय : पालिका कर्मचाऱ्यांचा त्रास होणार कमी

पुणे – महापालिकेकडून पोलिसांमध्ये दाखल केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या स्वरुपाच्या फौजदारी तक्रारींसाठी आता पोलीस आयुक्तालयात “एक खिडकी’ योजना राबविली जाणार आहे. आयुक्त सौरभ राव यांनी ही माहिती दिली.

-Ads-

शहरातील महापालिका आणि पोलिसांशी संबंधीत प्रश्‍नांबाबत नुकतीच संयुक्त बैठक झाली. यास पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांच्यासह आयुक्त राव आणि पालिकेच्या वेगवेगळ्या विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

महापालिकेकडून न्यायालयाच्या आदेशानुसार तसेच कायद्यातील तरतूदीनुसार अनधिकृत बांधकामे, रस्त्यावरील अतिक्रमणे, शहरात अनधिकृत जाहीराती लावणे, तसेच शहर विद्रूपीकरणांतर्गत वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले जातात. त्यासाठी पालिकेचे संबंधीत अधिकारी पोलीस ठाण्यात गेल्यानंतर त्यांना एक तक्रार देण्यासाठी सात ते आठ तास थांबविले जाते. तर कधी कधी एक ते दोन दिवस पोलीस ठाण्यात बसवून ठेवले जाते. त्यामुळे काम सोडून थांबावे लागत असल्याने महापालिका कर्मचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. या तक्रारीनंतरही फौजदारी गुन्हा दाखल केला जात नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना वारंवार पोलीस ठाण्याशी संपर्क साधून एफआयआर क्रमांक घेण्यासाठी पाठपुरावा करावा लागतो. त्यामुळे पालिका कर्मचारी गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करतात. या संयुक्त बैठकीत महापालिकेकडून ही बाब पोलीस आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर आयुक्तांनी याबाबत सर्व संबंधित पोलीस ठाण्यांना सूचना देण्यासह पालिकेच्या तक्रारींसाठी पोलीस आयुक्तालय कार्यालयात स्वतंत्र एक खिडकी योजना राबविली जाईल. तसेच या तक्रारी या ठिकाणाहून संबंधित पोलीस ठाण्यांना पाठवून तातडीने गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली जाईल, असा निर्णय घेतल्याचे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.

बेवारस वाहनांवर पुन्हा कारवाई
न्यायालयाच्या आदेशानुसार, महापालिकेकडे राज्य शासनाने बेवारस वाहने जप्त करण्याची कारवाई आता पोलीस तसेच आरटीओकडे देण्यात आली आहे. मात्र, पालिकेच्या मदती शिवाय, ही कारवाई करणे शक्‍य नसल्याचे या बैठकीत पोलीस आयुक्तांकडून सांगण्यात आले. या कारवाईसाठी पालिका आवश्‍यक असलेली वाहने, जप्त वाहने ठेवण्यासाठी जागा तसेच काही मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आयुक्त राव यांनी सांगितले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)