पालिकेसमोरील चेबरलाच गळती

पाणी पुरवठा सभापती, अधिकारी कुंभकर्णी झोपेत

सातारा, दि.29 (प्रतिनिधी) – जुन महिना संपत आला तरी मान्सूनचे जोरदार आगमन झालेले नाही. पावसाने ओढ दिल्यामुळे कास तलाव अद्यापही भरलेला नाही. कास परीसरात पावसाची भुरभूर सुरू असली तरी कास तलावातील पाणी साठ्यात अंशत: वाढ झाली आहे. मात्र सातारकरांवरील पाणी टंचाईचे संकट टळलेले नाही. पालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील भोंगळ कारभारामुळे नेहमीच रस्त्यावरून रोज लाखो लिटर पाणी गटारगंगेला वाहत असते. पालिकेपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या चेंबरमधून रोज हजारो लिटर पाणी रस्त्याने वाहत असते. गेल्या अनेक दिवसांपासून या चेंबरच्या पाण्याची गळती काढावी, अशी मागणी नागरिकांनी केली तरी कुंभकर्णी झोपेत असणाऱ्या सभापती, अधिकाऱ्यांना मात्र काही जाग येत नाही. पालिकेचा पाणी पुरवठा विभाग मात्र या गळतीकडे दुर्लक्ष करीत आहे. सातारकरांना मुबलक पाणी असूनही पाणी पुरवठा विभागातील भोंगळ कारभारामुळे नागरीकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. शहरातील ठिकठिकाणी सुरू असलेल्या गळतीमुळे पालिका कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली जात आहेत. पाणी पुरवठा विभागाच्या कारभारात सुधारणा होणार का? पाणी पुरवठा विभागाचा कारभार सुधारण्यासाठी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनीच आता लक्ष घालावे, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
सातारा शहराला तीन ठिकाणावरून पाणी पुरवठा होत असला तरी नागरीकांना आजही मुबलक पाणी मिळत नाही. पालिका, जीवन प्राधिकारणाचे अधिकारी यांच्यात ताळमेळ नसल्याने शहरातील पूर्व आणि पश्‍चिम भागासह शहरालगतच्या उपनगरातील नागरीकांना पाणी टंचाई त्यांच्या पाचवीलाच पुजली आहे. पालिका आणि जिवन प्राधिकरण यांच्या भोंगळ कारभारामुळे शहरातील गळतीव्दारे सुमारे लाखो लिटर पाणी गटारगंगेला वाहून जात असते. गळतीची कामे दर्जेदार होत नसल्याने गळतीचे प्रमाण दिवसें-दिवस वाढतच आहे. सातारकरांना केवळ 24 तास पाण्याच्या घोषणा ऐकवयास मिळत आहेत. मात्र, प्रत्यक्षात पाणी काही मिळत नाही. पालिकेच्या कारभाऱ्याचेच पाणी गळतीकडे दुर्लक्ष होत असल्याने पाणी असूनही नागरीकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहेत.
गतवर्षी 27 जुनला पावसाने सुरूवात केली होती. आणि 5 ते 6 जुलैच्या दरम्यान सातारला पाणी पुरवठा करणारा कास तलावा ओसांडून वाहत होता. यावर्षी मान्सूनचे आगमन जुनमध्येच होणार असे भाकीत हवामान खात्याने वर्तविले होते. हवामान खात्याचा अंदाज फोल ठरला आहे. जुन महिना संपाला तरी अद्यापही मान्सूनचे जोरदार आगमन झाले नाही. जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात अजुनही उन-पावसाचा खेळ सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे. कास तलावाच्या परिसरात पावसाची भुरभूर सुरू असली तरी कास तलावाच्या पाणी साठ्यात अंशत: वाढ झाली आहे. त्यामुळे सातारकरांना आजही पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. असे असताना पालिकेसमोरील चेंबरला अनेक दिवसांपासून लागलेली गळती पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून काढली जात नाही. सर्व पदाधिकारी येथूनच ये-जा करत असतात. त्यांना पाण्याची गळती दिसत नाही का? शहराच्या पुर्व भागात नागरीकांना मीटर पाणी पुरवठा केला जातो. मात्र पालिकेच्या दारातच चेंबरच्या गळतीव्दारे हजारो लिटर पाणी रस्त्याने वाहत जात आहे. वाया जाणाऱ्या पाण्याची भरपाई पालिकेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल त्यांच्याकडून वसुल करून घेण्यात यावी अशी मागणी नागरीकांमधून केली जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)