पालिकेविरोधातील अवमान याचिका रद्द

नदीपात्रातल्या रस्त्यावरील राडारोडा उचलून वृक्षारोपण


हरित लवादाने व्यक्त केले कामाबाबत समाधान

पुणे – महापालिका आणि पाटबंधारे विभागाने विठ्ठलवाडी येथे नदीपात्रातील रस्त्याचा राडारोडा उचलला आहे. तसेच, याठिकाणी वृक्षारोपणही केल्याने समाधान व्यक्त करत हरित लवादाने पर्यावरण प्रेमी सारंग यादवाडकर यांनी दाखल केलेले अपिल रद्द केल्याने महापालिका प्रशासनाने सुस्कारा सोडला आहे.

या अपिलाविरोधात अभ्यासपूर्ण तयारी करणाऱ्या महापालिकेच्या विधी सल्लागार अॅड. निशा चव्हाण यांनी यासंदर्भात माहिती दिली. अॅड. चव्हाण यांनी सांगितले, पुणे महापालिकेने सिंहगड रस्त्यावरील नागरिकांच्या सोयिसाठी काही वर्षांपूर्वी विठ्ठलवाडी येथे नदीपात्रातून रस्ता आखला होता. प्रत्यक्षात या रस्त्याचे काम करण्यासाठी भरावही टाकण्यात आला होता. परंतु, काही पर्यावरण प्रेमी मंडळींनी हा रस्ता निळ्या पुररेषेच्या आतमध्ये असल्याने पूरस्थिती गंभीर होईल. तसेच विठ्ठलवाडी, हिंगणे येथील वसाहतींना धोका निर्माण होईल, अशी याचिका हरित लवादाकडे दाखल केली होती. या याचिकेवर साधारण तीन वर्षांपूर्वी निर्णय देताना लवादाने महापालिकेला झटका दिला होता. पालिकेने रस्त्याच्या कामासाठी टाकलेला भराव काढून टाकावा, नदी पात्रालगत बांधलेली भिंत काढून टाकावी, भराव टाकताना काढून टाकण्यात आलेल्या झाडांच्या ठिकाणी नव्याने वृक्षारोपण करावे असे आदेश दिले होते. लवादाच्या आदेशानुसार महापालिकेने राडारोडा काढून टाकण्यासाठी निविदा प्रक्रियाही राबविली आणि कामही सुरू केले. गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान महापालिकेच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ एस. के. जैन यांनी महापालिका आणि पाटबंधारे विभागाने लवादाच्या आदेशानुसार केलेल्या उपाययोजनांची माहिती देत पालिकेची बाजू मांडली. हरित लवादाने दोन्ही बाजुकडील म्हणणे ऐकून घेत लवादाने दिलेल्या आदेशाचे महापालिका व पाटबंधारे विभागाने पालन केल्याचे समाधान व्यक्त करत यादवाडकर यांनी दाखल केलेले अपिल रद्द केले, अशी माहिती अॅड. चव्हाण यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तज्ज्ञांकडून वेळोवेळी कामाची पाहाणी
याचिकाकर्त्यांपैकी सारंग यादवाडकर यांनी महापालिकेने लवादाच्या आदेशानुसार राडारोडा उचलला नाही, वृक्षारोपणही केले नाही. हिंगणे येथील नदीपात्रालगत असलेल्या सोसायटीलगतचा आणि नदीपात्रात असलेला रस्ता अद्यापही तसाच असून हा न्यायालयाचा अवमान असल्याचे अपिल हरित लवादाकडे दाखल केले होते. लवादाने तज्ज्ञांची समिती स्थापन करून या कामाचा अहवाल द्यावा, असे आदेश महापालिका आणि पाटबंधारे विभागाला दिले होते. त्यानुसार महापालिका आणि पाटबंधारे विभागाने अहवाल तयार करून लवादापुढे सादर केला होता. हा अहवाल सादर करताना पूररेषेचे नकाशे, महापालिका आणि पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ अधिकारी, तक्रारदार, स्थानिक रहिवासी आणि समितीतील तज्ज्ञांनी वेळोवेळी केलेल्या या कामाच्या पाहाणीच्या नोंदी, छायाचित्र, तक्रारदाराचे समाधान होईपर्यंत केलेली कामे याची इत्यंभूत माहिती लवादापुढे सादर केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)