पालिकेत “डर्टी पिक्‍चर’ करणारे सापडले!

“प्रभात’च्या वृत्तानंतर सात थुंकीबहाद्दरांवर कारवाई


स्वच्छता करून केली दंडाचीही वसुली

पुणे – शहरात रस्त्यांवर थुंकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू असताना महापालिका मुख्य इमारतीच्या भिंतीच गुटखा आणि पानाच्या पिचकाऱ्यांनी रंगल्याचे दैनिक “प्रभात’ने सचित्र समोर आणले होते. याची गंभीर दखल घेत महापालिका प्रशासनाने बुधवारी पालिकेच्या इमारतीमध्ये थुंकणाऱ्या 7 जणांना रंगेहाथ पकडले असून त्यांच्याकडून प्रत्येकी 150 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाच, शिवाय भिंतींची स्वच्छताही करून घेण्यात आली.

“पालिकेतील डर्टी पिक्‍चर दिसणार का’ या मथळ्याखाली प्रभातने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते. महापालिकेने संपूर्ण शहरात स्वच्छतेचा “ड्राईव्ह’ सुरू करून सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या तब्बल साडेचारशे थुंकीबहाद्दरांवर कारवाई केली. तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवरही कारवाईला सुरूवात केली आहे. शहरात या कारवाईचे स्वागत होत असतानाच, महापालिकेच्या मुख्य इमारतीसह, नवीन विस्तारीत इमारत क्षेत्रीय कार्यालयांच्या इमारतींचीच्या भिंतीही थुंकणाऱ्या व्यक्तींकडून रंगविण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या शहरातील वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये दररोज नागरिकांची ये-जा असते. त्यातील अनेकजण पान, गुटखा, तंबाखू तत्सम पदार्थ खाणारे असतात. महापालिका भवनात पोहोचल्यानंतर इच्छित कार्यालयात जाण्याआधी तोंडात भरलेला या पदार्थांचा “बकणा’ त्यांना कोठेतरी रिता करायचा असतो. त्यासाठी हे थुंकीबहाद्दर रस्ता किंवा कोपरा याचा आधार घेतात.

-Ads-

महापालिका आवारात आल्यानंतर ज्या ठिकाणी वाहने लावली जातात, त्याठिकाणी पावसाळी जाळ्या आहेत. वाहन पार्क केल्यानंतर तेथेच पान, तंबाखू खाऊन पिंक टाकली जाते. त्यामुळे अनेक पादचाऱ्यांचा पाय त्यावर पडतो आणि शिसारी येते. एवढेच नव्हे, तर त्याठिकाणी ठेवलेल्या शोभेच्या झाडांच्या कुंड्या आणि भवनाच्या कडेला लावलेल्या शोभेच्या झाडांच्या मातीतही पिंक टाकली जाते, त्यामुळे दुर्गंधी येते. ही बाब समोर आल्यानंतर महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने मुख्य इमारतीमध्ये तीन पथके तैनात केली होती. त्यांनी संपूर्ण इमारतीच्या परिसरात गस्त घालून आज दिवसभरात ही कारवाई केल्याचे प्रशासनाने सांगितले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)