पालिकेच्या 36 कर्मचाऱ्यांना “सहावा वेतन’ही नाही

सातारा – सातारा पालिका प्रशासनाच्या कणा बनलेल्या 36 कर्मचाऱ्यांच्या प्रस्तावाला मंत्रालयात ही कोणी वाली उरलेला नाही. गेल्या सतरा वर्षात या कर्मचाऱ्यांना सातवा सोडा सहा व्या वेतन आयोगाचेसुध्दा नीट वेतन मिळेनासे झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे खुद्द खासदार उदयनराजे भोसले यांनीच पाठपुरावा करून हा गुंता सोडवावा, अशी अपेक्षा व्यक्त होऊ लागली आहे.

मुख्यमंत्री 3 रोजी नायगाव येथे सावित्रीबाई फुले जयंती निमित्त येत आहेत. तिथे पालिकेचे 36 कर्मचारी उदयनराजे समवेत मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. अभियंत्यांना बॅक डोअर एन्ट्री कशी मिळेल यासाठी पालिका मुख्याधिकारी शंकरराव गोरे यांनी मंत्रालयाचे उंबरे झिजवायचे उद्योग सुरू केले होते. मात्र ज्या 36 कर्मचाऱ्यांनी प्रशासनाचा कणा सांभाळला त्यांची पदे नियमित करण्यासाठी असणारी प्रशासकीय व राजकीय इच्छाशकती कमी पडत असल्याने या कर्मचाऱ्यांच्या पुनर्वसनाचा वनवास संपलेला नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या पुनर्वसनाचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी सावित्रीबाई फुले जयंतीचा मुहूर्त शोधण्यात आला आहे. खासदारांनी हा विषय अजेंड्यावर घेण्याचे ठरवले आहे. शहराच्या विकास कामांबरोबर सातारा पालिका कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा, अशी आस कर्मचारी संघटना बाळगून आहे. नगरविकास राज्यमंत्र्यांनी सातारा पालिकेच्या 36 कर्मचाऱ्यांना अंशत: मंजुरीचे मध चाटवले खरे मात्र पुनर्वसनाचा प्रस्ताव डीएमए कार्यालय व विभागीय आयुक्त कार्यालय यांच्या दरम्यानच लटकून पडला आहे. रोस्टर, पदोन्नती, वेतनाचे लाभ, तसेच शैक्षणिक पात्रता या अनेक निकषांवर पुनर्वसनाच्या प्रस्तावाची विकेट गेली आहे. मात्र 36 कर्मचाऱ्यापैकी चौघे निवृत्त झाले. इतर 32 जणांपैकी काहींची शैक्षणिक पात्रता हा निकष पूर्ण होत नाही. मात्र या कर्मचाऱ्यांची अठरा वर्ष सेवा झाली आहे.

या सेवेला डावलण्यात येऊ नये यासाठी या कर्मचाऱ्यांचा मंत्रालय पातळीवर तब्बल सोळा वर्ष संघर्ष सुरू आहे. शहराची विकासकामे बाजूला ठेऊन नको त्या कामांसाठी मुख्यमंत्र्यांच्या परवानगीसाठी गोरेंनी अभियंत्यांना घेऊन मंत्रालयाचा दौरा केल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. मात्र, स्वतः गोरे यांनी नगरविकास विभागाचा दौरा केला होता. मात्र सातारा पालिकेच्या आस्थापनेवर तब्बल सात इंजिनिअर शासन कोट्यातून आलेले असताना वार्षिक वीस लाख रुपयांचे मानधन सातारकरांच्या खिशातून घेणाऱ्या अभियंत्यांचे फाजील लाड कशासाठी खपवून घेतले जात आहेत, असा जाब आता सातारकरांनी थेट खासदार उदयनराजे भोसले यांनाच विचारावा अशी वेळ आली आहे. मात्र तीव्र जनभावना लक्षात घेऊन उदयनराजे यांनी या प्रश्‍नाचा सुवर्णमध्य साधण्याची तयारी केली आहे.

कंत्राटी इंजिनिअरच्या मागची राजकीय शक्‍ती छत्तीस जणांसाठी लावावी यासाठी कामगार संघटना आक्रमक होण्याची चिन्हे आहेत. या प्रश्‍नावर उदयनराजे स्वतः नगरविकास विभागाचा कार्यभार असणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहेत. कदाचित ही चर्चा नायगाव ता खंडाळा येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे निमित्त साधण्याचा उदयनराजे यांचा मानसं आहे. तब्बल वीस वर्ष कोणतेही कंत्राट न निघता कंत्राटी इंजिनियर आस्थापनेवर
राहतात मग जे कर्मचारी आस्थापनेवर आहेत त्यांच्या पुनर्वसनाचे भिजतं घोंगडे किती दिवस तसेच ठेवायचे ? या प्रश्‍नाच उत्तर सध्या तरी कोणाकडेच नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)