पालिकेच्या पोलीस ठाण्यांना लागणार “कुलूप’?

File photo

अवघ्या दोन वर्षांतच बंद : कर्मचारी वळवणार पोलीस आयुक्तालयात


महापालिका, पोलीस प्रशासनाचा संयुक्त निर्णय

-Ads-

पुणे – शहरातील अनधिकृत बांधकामे तसेच अतिक्रमणांवरील कारवाई प्रभावीपणे होण्यासाठी महापालिकेसाठी राज्य शासनाने स्वतंत्र पोलीस ठाणे मंजूर केले आहे. मात्र, ते अवघ्या दोन वर्षांतच बंद केले जाणार आहेत. महापालिका आणि पोलीस प्रशासन यांच्या नुकत्याच झालेल्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांनी दिली.

शहरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामांची संख्या वाढली आहे. त्यावर कारवाई करण्यासाठी महापालिकेस मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्ताची आवश्‍यकता भासते. अशा स्थितीत वेळेवर बंदोबस्त न मिळाल्याने सक्षमपणे कारवाई करता येत नाही. परिणामी, अनेकदा न्यायालयाच्या रोषास तसेच पुणेकरांच्या टीकेचाही सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने राज्य शासनाकडे स्वतंत्र पोलीस ठाण्याची मागणी केली होती. त्यानुसार, त्यास मान्यता देत 158 पदांची निर्मितीही केली. यासाठी कर्मचारी पुणे पोलीस आयुक्तालयाकडून प्रतिनियुक्तीने भरण्यात येणार होते. त्यासाठी त्यांचे वेतन आणि इतर बाबींसाठी आवश्‍यक रक्‍कमही महापालिकेकडून पोलीस आयुक्तालयास अदा केली होती. मात्र, त्यानंतरही केवळ 65 कर्मचाऱ्यांचीच नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेस अजूनही पोलीस बंदोबस्तासाठी पोलीस आयुक्तांना साकडे घालावे लागत असल्याचे चित्र आहे. या पोलीस ठाण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र बसण्याची व्यवस्था केली असून त्यावर लाखो रुपयांचा निधीही खर्च केला आहे.

मनुष्यबळ कमी पडत असल्याने निर्णय
मागील आठवड्यात महापालिकेशी संबंधीत प्रश्‍नांबाबत पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांच्याकडे बैठक झाली. यात महापालिकेकडून अतिक्रमण पोलीस ठाण्यांसाठी मंजूर झालेले कर्मचारी तसेच, बंदोबस्तासाठी आवश्‍यक असलेले पोलीस वेळेवर मिळावेत, अशी विनंती महापालिकेकडून करण्यात आली. त्यावेळी मनुष्यबळाबाबत या दोन्ही विभागांत चर्चा करण्यात आली. या चर्चेत पोलीस आयुक्‍तांकडून तूर्तास नवीन कर्मचारी नियुक्त करणे शक्‍य नसल्याचे सांगण्यात आले. तसेच शहरासाठी सध्या मनुष्यबळ कमी पडत असल्याने, पालिकेस देण्यात आलेले कर्मचारी पुन्हा पोलीस आयुक्तालयाकडे वर्ग करावेत, त्यानंतर महापालिकेस गरज असेल तेव्हा बंदोबस्त दिला जाईल, असे सांगण्यात आले. तसेच सध्या पालिकेकडील कर्मचाऱ्यांना दररोज बंदोबस्त नसतो, ही बाब लक्षात घेऊन हा निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली. त्यास महापालिकेकडूनही सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे. त्यामुळे हे कर्मचारी पुन्हा पोलीस आयुक्तालयाकडे वर्ग करून हे पोलीस ठाणे बंद केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

पोलीस आयुक्तांशी नुकतीच चर्चा झाली आहे. त्यांच्याकडून नवीन कर्मचारी देणे शक्‍य नसल्याचे सांगण्यात आले असून, सध्या पालिकेकडे असलेले कर्मचारी पुन्हा पोलीस आयुक्तालयात द्यावे अशी मागणीही करण्यात आली आहे. त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नसून सर्व बाबी पाहून पुढील निर्णय घेतला जाईल.

– सौरभ राव, आयुक्त, महापालिका


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)