पालिकेच्या कार्यक्षमतेमुळे मुंबई दुसऱ्या दिवशी पूर्वपदावर – उद्धव ठाकरे

मुंबई – मुंबई महापालिकेने तत्परतेने केलेल्या कामामुळे आणि कार्यक्षमतेमुळेच मंगळवारच्या मुसळधार पावसानंतरही दुसऱ्याच दिवशी शहर पूर्वपदावर आले, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ते बुधवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते.

मंगळवारच्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून मुंबई ठप्प झाली होती. या मुद्द्यावरून विरोधकांकडून पालिकेतील सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेला लक्ष्य करण्यात येत आहे. मात्र, उद्धव यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत पालिकेच्या कार्यक्षमतेमुळेच परिस्थिती इतक्‍या लवकर नियंत्रणात आल्याचे सांगितले.
मला टीका करणाऱ्यांशी काही देणे-घेणे नसून मी जनतेसाठी काम करतो. मला याबाबतीत इतरांवर आरोप करून कुठलेही राजकारण करायचे नाही. मुळात राजकारणासाठी इतक्‍या नीच पातळीवर मी जाऊ इच्छित नाही. त्यामुळे आरोप करणाऱ्यांनी मुंबईसाठी काय केले, हे सांगावे, असा प्रश्‍न उद्धव यांनी विरोधकांना विचारला.

काल पावसात मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले आणि त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली, हे आम्ही पूर्णपणे मान्य करतो. मात्र, त्यानंतर महापालिकेने केलेल्या प्रयत्नांमुळेच परिस्थिती लवकरात लवकर नियंत्रणात आली. मनपा आणि बेस्ट कर्मचाऱ्यांच्या सजगतेमुळेच हे शक्‍य झाले.

उद्यापासून आरोग्य शिबिर
अनेक ठिकाणी कचरा रस्त्यावर आल्यामुळे रोगराई पसरण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे उद्यापासून शिवसेनेकडून मुंबईत आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. याशिवाय लेप्टोसारख्या आजारांपासून मुंबईकरांचा बचाव करण्यासाठी पालिकेकडून आज रात्रीपर्यंत सूचना पत्रक जारी करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)