पालिकेचे वाहन चालक भरदिवसा तरररार्ट…..

अधिकाऱ्यांसाठी राखीव पार्कींगमधील गटारात दारुच्या बाटल्यांचा खच
पुणे – महापालिका अधिकाऱ्यांच्या दिमातीस असणाऱ्या आणि ठेकेदाराकडून भाडे तत्वावर घेलेल्या गाड्यांचे वाहन चालक भरदिवसा दारूच्या नशेत तर्र असल्याचे समोर येत आहे. या गाड्यांच्या पार्कींगमध्ये असणाऱ्या पावसाळी गटाराच्या चेंबरमध्ये तब्बल 400 ते 500 दारूच्या रिकाम्या बाटल्या आणि प्लास्टिकचे ग्लास सापडले आहेत. हे गटार शनिवारी झालेल्या अवकाळी पावसाने तुंबले होते. त्याची गुरुवारी सकाळी स्वच्छता करण्यात आली असता तेथे हा बाटल्यांचा खच आढळून आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे महापालिका आयुक्तांच्या गाडीसाठी राखीव जागेला चिटकून हे चेंबर आहे. त्यामुळे तिकडे कोणी फिरकत नसल्याने या बाटल्या या ठिकाणी टाकण्यात आल्या आहेत.
महापालिका अधिकारी आणि दैनंदिन कामासाठी लागणाऱ्या गाड्या मुख्य इमारतीच्या डाव्या बाजूला आलेल्या पार्किंगमध्ये दिवसा लावल्या जातात. त्यात महापालिकेसह ठेकेदाराच्याही गाड्या असतात. सांध्याकाळी अधिकाऱ्यांना घरी सोडल्यानंतर काही गाड्या पुन्हा रात्री पार्किंगमध्ये लावल्या जातात. त्यामुळे संपूर्ण दिवसभर चालक या परिसरातच बसून असतात. रात्री उशीराही या ठिकाणी थांबतात. पार्किंगमधील अंधाराचा फायदा घेत काहीजण गाडीतच तर काहीजण आडोशाला तर्राट होतात. त्यानंतर या बाटल्या गाडीत ठेवणे शक्‍य नसल्याने कोणाचे लक्ष नसताना गुपचूप चेंबरमध्ये
टाकल्या जातात. याशिवाय हे पार्किंग बहुमजली असल्याने त्यावर सुशोभीकरणासाठी लावलेल्या झाडांमध्ये या बाटल्या लपविल्या जातात. दुसऱ्या दिवशी स्वच्छता करताना हा कचरा उचलला जातो. दरम्यान, या प्रकरणी पालिकेचे वाहनचालक या बाटल्या खासगी वाहन चालकांच्या असल्याचे तर ठेकेदाराकडील वाहनचालक या बाटल्या पालिकेच्या चालकांच्या असल्याचे आरोप करत आहेत.

चेंबरमध्ये बाटल्यांचा खच
या पार्किंगमध्ये पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या गटारावर सुमारे 15 ते 20 चेंबर आहेत. या सर्वच चेंबर मध्ये थोड्या फार प्रमाणात या रिकाम्या बाटल्या आढळल्या आहेत. या बाटल्या काचेच्या असल्याने त्या प्लास्टिक आणि मातीच्या कचऱ्यात अडकल्या होत्या. त्यामुळे हे चेंबर नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसात ब्लॉक झाले होते. एरवी ते प्रत्येक महिन्याला साफ केले जाते. मात्र, गेल्या काही महिन्यात त्याची सफाई झाली नव्हती. पावसाळा सुरू होत असल्याने त्याची सफाई सुरु करताना एवढ्या मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या आढळल्याने कर्मचारीही हवालदिल झाले आहेत.

सुरक्षा रक्षक आणि टोळक्‍यांच्या पार्ट्या
केवळ चालकच नाही तर रात्री महापालिकेच्या सुरक्षेची जबाबदारी असलेले काही सुरक्षा रक्षकही रात्री पालिकेच्या आवारात दारू आणि पार्टीवर ताव मारतात, या शिवाय काही खासगी टोळकी रात्रीच्या वेळी बहुमजली पार्कींगमध्ये वाहने पार्क करून पार्ट्या करतात. मात्र, त्यात अनेकदा सुरक्षा रक्षकच सहभागी होत असल्याने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. काही वर्षांपूर्वी महापालिकेच्या आवारात अशाच प्रकारे साफसफाई करताना दारूच्या बाटल्यांचा ढीग आढळला होता. त्यानंतर तत्कालीन अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी काही कर्मचाऱ्यांवर कारवाई
केली होती. मात्र, आता पुन्हा हे प्रकार सुरू झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)