पालिकेचे एका दिवसाचे ‘मराठी भाषा संवर्धन’

शेवटच्या दिवशीच स्पर्धा : उपक्रमासाठी वेळ नाही का?

पुणे – मराठी भाषेच्या प्रसार, प्रचार तसेच संवर्धनासाठी महापालिकेकडून 1 ते 15 जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केला जाणार आहे. मात्र, या पंधरा दिवसांत पालिकेच्या केवळ शेवटच्या दिवशीच कर्मचाऱ्यांसाठी स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे आपल्याच उपक्रमासाठी महापालिकेस वेळ नाही का? असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्यात मराठी भाषा संवर्धनासाठी समिती नेमणारी पुणे ही देशातील पहिली महापालिका ठरली आहे. या समितीच्या माध्यमातून संपूर्ण वर्षभर वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. मात्र, नवीन वर्षातच या उपक्रमांना तिलांजली देण्यात आली असल्याचे चित्र आहे. पालिकेकडून या समिती अंतर्गत 1 ते 15 जानेवारी या कालावधीत हा पंधरवडा साजरा केला जाणार होता. त्यासाठी वेगवेगळे उपक्रमही निश्‍चित करण्यात आले होते. त्यात पालिका शाळांमध्ये मुलांसाठी तसेच कर्मचाऱ्यांसाठी मराठी भाषेशी संबंधित स्पर्धा घेणे यासह शहरात ग्रंथ प्रदर्शन भरविणे, असे उपक्रम निश्‍चित करण्यात आले होते. मात्र, त्यांचे नियोजन न झाल्याने यातील कर्मचारी तसेच मुलांचे उपक्रम एकाच दिवशी म्हणजे 15 जानेवारी रोजी घेतले जाणार आहेत. त्यात इंग्रजी शब्दांचे अर्थ मराठीत लिहणे, मराठी भाषेतील कामकाजाचे फायदे या विषयांवर निबंध स्पर्धा तसेच मराठी भाषेची वैशिष्टे या विषयावरील वक्तृत्त्व स्पर्धा या उपक्रमांचा समावेश आहे.

साहित्य संमेलनाचाही फटका
महापालिकेने निश्‍चित केलेल्या काही उपक्रमांना यवतमाळ येथे 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचाही फटका बसला आहे. महापालिकेने या पंधरावड्यात दोन दिवसांचे ग्रंथ प्रदर्शन शहरात आयोजित केले होते. मात्र, हे साहित्य संमेलन 11 ते 13 जानेवारी या कालावधीत होणार आहे. त्यामुळे ग्रंथविक्रेते आधीच यवतमाळला गेले आहेत. त्यामुळे महापालिकेकडून आपले ग्रंथ प्रदर्शन पुढे ढकलेले असून आता हे पंधरवड्या निमित्ताने होणारे प्रदर्शन 27 आणि 28 जानेवारी रोजी पु.ल. देशपांडे उद्यानात होणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)