पालिकेकडून भाजीमंडई परिसरात स्वच्छता मोहीम

रिकाम्या बाकड्यांसहीत दोन खोकी हटवली

कराड – येथील नगरपालिकेच्या वतीने मंगळवारी भाजीमंडई परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत व्यापाऱ्यांनीही सहभाग घेतला होता. मोहिमेंतर्गत भाजीमंडई परिसरात असणारी दहा ते पंधरा रिकामे बाकडी पालिकेने ताब्यात घेतली. तसेच सोमेश्‍वर मंदिरानजीकची दोन खोकीही हटविण्यात आली.

स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत पालिकेकडून शहरात ठिकठिकाणची स्वच्छता करण्यात येत आहे. प्रत्येक विभागासाठी वेगळ्या पथके तयार करण्यात आली आहे. त्यांच्या कामाचे विभाजनही पालिकेने केले आहे. स्वच्छतेबरोबरच जंतूनाशक फवारणीचे कामही सुरू आहे. ज्याठिकाणी स्वच्छता मोहिम होते तेथे लगेच दुसऱ्या पथकाकडून फवारणीही केली जाते. या फवारणीमुळे शहरात डासांचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच स्वच्छ व सुंदर शहराची प्रतिमा तयार होऊ लागली आहे.

मंगळवारी दुपारी मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजी मंडई परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत भाजीमंडई परिसरातील सर्व व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला होता. आपला परिसर स्वच्छ ठेवणार असल्याचे अभिवचनही व्यापाऱ्यांनी यावेळी दिले. तसेच कोठेही इतरत्र भाजीपाला व इतर कचरा टाकू नये अशा सुचना डांगे यांनी केल्या. प्रत्यक्ष त्यांनीही या मोहिमेत सहभाग घेतल्याने स्थानिक नागरिकही स्वच्छतेसाठी पुढे सरसावले होते. यामध्ये माजी नगरसेवक सुभाष घोडके, माजी नगरसेवक प्रकाश जाधव, व्यापारी संजय भोसले, मुन्ना शेख, बसाप्पा पाटील, बाळू मसूरकर यांच्यासह इतर नागरिकांचा समावेश होता.

पंधरा रिकामी बाकडी हटवली
भाजीमंडईकडून अल्ताफ शिकलगार यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर गेली अनेक वर्षे रिकामी बाकडे पडून होती. तेथे कोणीही व्यापारी बसत नसल्याने मुख्याधिकारी डांगे यांनी ही बाकडी पालिकेच्या ताब्यात घेण्याच्या सूचना केल्या. गेली अनेक वर्षे पडून असणारी बाकडी उचलल्याने हा रस्ता रिकामा झाला आहे. त्याचबरोबर सोमेश्‍वर मंदिरानजीक असणारी दोन खोकीही हटविण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)